वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा आणि जुना ग्रह म्हणजेच गुरू. हा ग्रह पृथ्वी किंवा मंगळासारखा ठोस, खडकाळ पृष्ठभागाचा नसून तो निव्वळ वायूंचा मोठा गोळाच आहे. त्याला ठोस, घन स्वरूपात कोअर नसल्याने एखादे यान या वायूच्या गोळ्याच्या आरपारही जाऊ शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
आपल्या ग्रहमालिकेतील गुरू आणि शनी या दोन ग्रहांना सत्तरपेक्षाही अधिक चंद्र आहेत. 'नासा'ने गुरू आणि त्याच्या चंद्रांच्या निरीक्षणासाठी 'गॅलिलिओ' आणि शनी व त्याच्या चंद्रांच्या निरीक्षणासाठी 'कॅसिनी' हे यान पाठवले होते. ही दोन्ही याने त्यांची मोहीम संपल्यावर त्याच ग्रहांवर 'क्रॅश' करून नष्ट करण्यात आली.
'गॅलिलिओ' आपल्या एका प्रोबसमवेत गुरूच्या वायूंनी भरलेल्या वातावरणात शिरले आणि जणू काही अदृश्यच झाले. ते गुरूच्या वातावरणात शिरल्यावर तासाभराने म्हणजेच सुमारे 150 किलोमीटर आत प्रवास केल्यानंतर त्याच्याशी असलेला संपर्क तुटला. गुरूच्या उच्च दाब आणि तापमानामुळे नष्ट होण्यापूर्वी हे यान किती अंतर आत गेले होते याबाबत संशोधकांना खात्री नाही.
मात्र, एक दिवस अंतराळयान गुरू किंवा शनीसारख्या 'गॅस जायंट' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रहांमध्ये खोलवर प्रवास करू शकेल का, हा प्रश्न संशोधकांनाही भेडसावत आहे. या दोन्ही ग्रहांवर यान खर्या अर्थाने 'क्रॅश' होण्यासाठी कठीण पृष्ठभाग नाही. त्यामुळे त्यांच्यामधून आरपार जाणारेही यान असू शकेल का, याचा विचारही केला जात आहे.
मात्र, तशी शक्यता आहे का? इंग्लंडमधील लिसेस्टर युनिव्हर्सिटीतील प्लॅनेटरी सायन्स विषयाचे सहायक प्राध्यापक ली फ्लेचर यांनी याचे उत्तर दिले 'नाही'! अशा एखाद्या 'गॅस जायंट'मधून कोणतेही यान सुरक्षित राहून आरपार जाऊ शकणार नाही. उच्च घनता, प्रचंड दाब आणि अतिशय उच्च तापमान यामधून तग धरून अशा वायूच्या विशाल गोळ्यांमधून आरपार जाणे केवळ अशक्य आहे. गुरू ग्रहाच्या केंद्रभागी एरव्ही वायुरूपात असलेला हायड्रोजन द्रवरूप धातूच्या रूपात असतो. तेथील तापमान सूर्याच्या पृष्ठभागाइतकेच उष्ण असते.
पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण म्हणून 'मरियाना ट्रेंच'ची ओळख आहे. महासागरांमध्ये अकरा किलोमीटर खोलीवर दाब एक हजार बार्स म्हणजेच एक लाख किलोपास्कल्स इतका असतो. एका चौरस इंच जागेवर आठ टनाचा भार ठेवल्याप्रमाणे हा दाब आहे. मात्र, गुरूच्या केंद्राजवळ दाब मेगाबारपर्यंत किंवा दहा लाख बार्सपर्यंत जातो. इतका प्रचंड दाब आणि उच्च तापमानातून कोणते यान जाऊ शकणार?