गवारीतही असतात अनेक पोषक घटक

गवारीतही असतात अनेक पोषक घटक
Published on
Updated on

गवारीच्या भाजीचे नाव जरी ऐकले तरी अनेकजण नाक-तोंड मुरडतात; पण तुम्हाला ठाऊक आहे का गवारीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. गवारीची भाजी हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच ही भाजी ए, बी, सी व के ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात प्रदान करते. त्यात कॅल्शियम, आयर्न व पोटॅशियम हे उपयुक्त घटकदेखील आढळतात. तज्ज्ञांनी सांगितलेले हे गवारीचे काही लाभ…

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर :

गवारीची भाजी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गवारीच्या भाजीच्या सेवनाने रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्याने चढ-उतार होत नाही. त्यामुळे मधुमेहींसाठी गवारीची भाजी खाणे फायदेशीर आहे.

हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त :

गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच या भाजीच्या सेवनाने हाडांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. या भाजीमध्ये फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

पचनास फायदेशीर :

गवारीची भाजी पचनासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीच्या सेवनाने आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते; ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. तसेच ही भाजी पोटातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि पचनासंबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

हृदयासाठी फायदेशीर :

गवारीची भाजी शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम असल्यामुळे हृदयाच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो.

रक्तदाबावर नियंत्रण :

गवारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात; जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहेत. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत गवारीच्या भाजीचे सेवन त्यांना फायदेशीर ठरू शकते.

मासिक पाळीसाठी फायदेशीर :

गवारीच्या भाजीचे सेवन मासिक पाळीमध्ये खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीमध्ये होणारा त्रास यामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

मानसिक शांतीचा लाभ :

गवारीच्या भाजीमुळे हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात; जे चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. गवारीच्या भाजीमुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळण्यास मदत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news