

वॉशिंग्टन : 'नासा'च्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये आता भेटीसाठी पर्यटक येतील, त्यावेळी तीन नजारे ओळीने स्क्रीनवर दिसून येतील. यात स्पेस शटल लाँच, स्पेसेक्स स्टारशिपचे चंद्रावरील लँडिंग आणि मंगळावरील अंतराळवीरांचा वॉक, याचा प्राधान्याने समावेश होईल. केनेडी स्पेस सेंटर पर्यटक संकुलात 3 हजार चौरस फूट आवारातील केनेडी एंट्री एक्स्पेरियन्स या व्हिडीओ वॉलचे उद्घाटन करण्यात आले.
सहा मिनिटांचा नवा व्हिडीओ यात समाविष्ट असून, त्यात अमेरिकेतील 6 दशकांचा अंतराळ वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. पहिल्यावहिल्या अंतराळ प्रवासापासून अगदी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतच्या वाटचालीचा यात समावेश आहे. दिवंगत माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी अंतराळ कार्यक्रमाबाबत जे विचार मांडले, त्याचाही यात प्राधान्याने उल्लेख आहे. भविष्यात 'नासा'च्या महत्त्वाकांक्षी योजना कशा असतील आणि त्यासाठी कसे नियोजन केले गेले आहे, याचाही यात समावेश करण्यात आला आहे.
एसएनए डिस्प्लेने हा व्हिडीओ वॉल पुरस्कृत केला आहे. एसएनए डिस्प्लेनेच न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर व देशभरातील अन्य क्रीडा व अन्य इव्हेंटमध्ये भव्यदिव्य डिजिटल साईन साकारले आहेत. यातील अॅनिमेशन न्यूयॉर्कस्थित मल्टिमीडिया टेक व ब्लंट अॅक्शन या डिझाईन स्टुडिओने पूर्णत्वास नेले आहे.