बीजिंग : चीनच्या कृत्रिम सूर्याने पुन्हा एकदा नवा विश्वविक्रम केला आहे. हेफेई येथील न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्टरमधून 1056 सेकंद किंवा सुमारे 17 मिनिटांपर्यंत 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्माण करण्यात आली. हा विक्रम गेल्या वर्षीच्या 30 डिसेंबरला बनवण्यात आला होता व त्याची माहिती आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या न्यूक्लिअर रिअॅक्टरमधून आतापर्यंतचा हा सर्वाधिक काळ आहे ज्यावेळी ऊर्जानिर्मिती झाली.
यापूर्वी या कृत्रिम सूर्याने 1.2 कोटी अंश सेल्सिअसची ऊर्जा निर्माण केली होती. दरम्यान, चीनच्या या नकली सूर्यातून बाहेर पडलेल्या मोठ्या ऊर्जेने जगाला 'टेन्शन' आले आहे! हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेजने एक्सपेरिमेंटल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामक हिटिंग सिस्टीम प्रोजेक्ट सुरू केला आहे. याठिकाणी हेवी हायड्रोजनच्या मदतीने हेलियम निर्माण केला जातो. या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते.
चायना अकादमी ऑफ सायन्सेजचे संशोधक गोंग शियाजू यांनी 7 कोटी अंश सेल्सिअसपर्यंत ऊर्जा निर्माण केल्याची घोषणा केली. गोंग यांच्या नेतृत्वाखाली हेफेई येथे हा प्रयोग सुरू आहे. त्यांनी सांगितले, आम्ही 1.2 कोटी अंश सेल्सिअसच्या प्लाज्मा तापमानाला 2021 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 101 सेकंदांपर्यंत मिळवले होते. यावेळी हे प्लाज्मा ऑपरेशन सुमारे 1056 सेकंद चालले. या काळात तापमान सुमारे 7 कोटी अंश सेल्सिअसपर्यंत होते.