

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात निरोगी व तंदुरुस्त राहणे हे एक आव्हानच बनलेले आहे. आरोग्यसंपन्न राहण्यासाठी व्यायामाबरोबरच योग्य आहाराचीही गरज असते. आपल्या शरीरांतर्गत असलेल्या महत्त्वाच्या पाच अवयवांमध्ये मेंदू, हृदय, यकृत, फुफ्फुसे आणि मूत्रपिंडांचा(किडनी) समावेश होतो.
किडनी म्हणजेच मूत्रपिंड ही आपल्या शरीरातील अशी फिल्टर आहेत जी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले ठेवणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी काही खाद्यपदार्थ लाभदायक ठरतात. त्यांची ही तज्ज्ञांनी दिलेली माहिती…
लसूण : किडनी च्या आरोग्यासाठी लसूण अतिशय लाभदायक आहे. त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस अत्यंत कमी प्रमाणात असतात व त्यामुळेच लसूण किडनी ची समस्या असणार्या लोकांसाठी लाभदायक ठरतो. लसणाच्या रोजच्या आहारातील समावेश आरोग्यासाठी चांगला असतो.
शिमला मिरची : या मिरचीचे नियमित सेवनही किडनी साठी आरोग्यदायी असते.
या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणात असतात. त्याशिवाय 'क' जीवनसत्त्वही अधिक असते.
ही मिरचीही आपल्या नियमित आहारात असणे गरजेचे आहे.
पालक : ही हिरवीगार भाजी अनेक प्रकारे, विशेषतः किडनी साठी शरीराला लाभदायक ठरते.
या भाजीत 'अ','क' ही जीवनसत्त्वे तसेच लोह, मॅग्नेशियम आणि फॉलेट मोठ्या प्रमाणात असते.
पालकमधील बीटा-कॅरोटिन रोगप्रतिकारकशक्ती वाढवतो.
अननस : हे फळही किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. त्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या फळात फायबर अधिक प्रमाणात असते.
ते किडनीशी संबंधित आजार कमी करण्यासाठी मदत करते.
कॉलिफ्लॉवर : फ्लॉवरमध्ये 'क' जीवनसत्त्व, फोलेट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते.
तसेच त्यामध्ये इंडोल्स, ग्लुकोसिनोलेटस् आणि थियोसायनेटस्ही भरपूर असतात.
अशा फ्लॉवरची भाजी किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लाभदायक ठरते.
[visual_portfolio id="3970"]