किट 300 मुळे इस्राईलला शत्रूशी लढणे आणखी सोपे

किट 300 मुळे इस्राईलला शत्रूशी लढणे आणखी सोपे

तेल अविव : सीमावाद, बाहेरच्या देशांकडून निर्माण होणारे धोके आणि युद्धजन्य स्थिती नजरेसमोर ठेऊन अनेक देश सध्या आपली शस्त्रसज्जता अधिक बळकट करत आहेत. याशिवाय लष्करालाही अद्ययावत करत आहेत. याबाबतीत इस्राईलचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने 'पोलारिस सोल्युशन'ने 'किट 300' सादर केले. हे किट थर्मल व्हिजुअल कन्सिलर (टीव्हीसी) सामग्रीपासून तयार करण्यात आले आहे. यामुळे सैनिकांना पाहणे शत्रूला अशक्यप्राय बनणार आहे.

'किट 300' तयार करण्यासाठी मायक्रोफायबर, धातू व पॉलिमगर मिश्रणाचा वापर करण्यात आला. यामुळे या किटला 'थर्मल इमेजिंक' कॅमेराही पाहू शकत नाही. घनदाट जंगल अथवा वाळवंटाचा विस्तीर्ण भाग असला तरी या किटला त्या त्या प्रदेशाप्रमाणे बदलता येऊ येते. कारण या किटचा रंग आवश्यकतेनुसार बदलणे शक्य आहे. तसेच ते जलरोधकही आहे. गरज भासल्यास या किटचा आकार दुप्पट मोठा करता येऊ शकतो. असे असले तरी वजनाने हे किट अत्यंत हलके आहे.

याशिवाय गरज भासल्यास याचा उपयोग स्ट्रेचर म्हणूनही करणे शक्य आहे. तसे पाहिल्यास नाईट व्हिजन उपकरणांना शक्तिशाली बनविण्यासाठी 'थर्मल इमेजर'चा वापर करण्यात येतो. मात्र, यापूर्वी उपकरणांना प्रकाशाच्या स्रोताची गरज असायची. मात्र, नव्या तंत्रज्ञानात ही अडचण दूर करण्यात आली. 'किट 300' मुळे इस्राईलला शत्रूशी लढणे आणखी सोपे होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news