

भुवनेश्वर : चालू वर्ष हे संयुक्त राष्ट्रसंघाने 'भरड धान्य वर्ष' घोषित केले आहे. या 'मिलेट्स' किंवा 'भरड धान्यां'मध्ये ज्वारी, बाजरी, बार्ली आणि नाचण्यासारख्या अनेक धान्यांचा समावेश होतो. ही धान्ये अतिशय पौष्टिक असतात व त्यामुळे भारताने या धान्यांच्या सेवनासाठी पुढाकार घेतलेला आहे. नाचणीचा वापर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत असतो. लहान मुलांना तसेच वृद्ध लोकांनाही नाचणीचे सत्त्व खाण्यास दिले जाते. उन्हाळ्यात नाचणीची आंबिलही घरोघरी केली जात असते. नाचणीचे सांडगे, पापडही बनवले जातात. आता ओडिशामध्ये नाचणीचे नवे चार वाण आढळले आहेत.
वैज्ञानिक सातत्याने पिकांच्या देशी वाणांच्या जर्मप्लाज्ममधील अनुवंशिक परिवर्तनांचा शोध घेत असतात. अशाच प्रकारच्या प्रयत्नातून संशोधकांना ओडिशातील जनजातीय क्षेत्र कोरापुटमध्ये उगवली जाणारी अधिक पौष्टिक आणि जास्त उत्पादन देणारी नाचणी शोधली आहे. त्यामध्ये भालू, लाडू, तेलुगु आणि बाडा या वाणांचा समावेश आहे. हे वाण प्रगत अशा हायब्रीड प्रजातींपेक्षाही अधिक सरस असल्याचे सांगितले जाते. स्थानिक समुदायांची अन्नाची आणि पोषणाची गरज ही पिके भागवत होती. संशोधकांनी कोरापूटच्या जनजातीय परिसरांमधून 33 पेक्षा अधिक नाचणीच्या मूळ प्रजाती गोळा केल्या. हवामानाबाबत या प्रजाती लवचिक असून पोषणाबाबत सरस आहेत.
ओडिशा केंद्रीय विश्वविद्यालय, कोरापूट आणि क्षेत्रीय केंद्र, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन, जयपूर येथील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले. या वाणांमध्ये उच्च प्रोटीन, कार्बोहायड्रेटस्, फायबर आणि अन्य पोषक घटक असल्याचे आढळून आले. त्यांच्यामध्ये फ्लेवोनोइडस् आणि अँटिऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणात आहेत. भोजन आणि पोषणाबाबत हे 'श्रीअन्न' देश-विदेशातील लोकांना अत्यंत लाभदायक ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.