एका आठवड्यातच प्लास्टिकचे विघटन करणारे एन्झाईम

एका आठवड्यातच प्लास्टिकचे विघटन करणारे एन्झाईम

वॉशिंग्टन : प्लास्टिक हा असा पदार्थ आहे ज्याचे नैसर्गिकरीत्या पाणी व मातीत लवकर विघटन होत नाही. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा शेकडो वर्षे तसाच साचून पर्यावरणाला तसेच सजीवांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. त्यावर जगभरात उपाय शोधले जात आहेत. आता अमेरिकेच्या टेक्सास युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासाठी एका नव्या एन्झाईमचा शोध लावला आहे. हे एन्झाईम प्लास्टिकचे केवळ एका आठवड्यातच विघटित करून मातीत मिसळू शकते. एरव्ही प्लास्टिकचे मातीत विघटन होण्यासाठी पाचशे वर्षांचाही कालावधी लागू शकतो!

'नेचर' नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार संशोधकांनी हे एन्झाईम बनवण्यासाठी मशिन लर्निंगचा वापर केला. 'एन्झाईम' हे एक प्रकारचे प्रोटिन असते जे कोणत्याही जैविक प्रक्रियेला गती देते. संशोधकांच्या मते, हे एन्झाईम खास पॉलिथिन टॅरीपिथालेट (पीईटी) नावाच्या प्लास्टिकला डीकंपोज करण्यासाठी बनवण्यात आले आहे. जगभरात 12 टक्के कचरा हा 'यूज अँड थ—ो' प्लास्टिक वस्तूंचा आहे.

त्यामध्ये पाण्याच्या बाटल्या, कंटेनर आदींचा समावेश होतो. अशा कचर्‍याला हे नवे एन्झाईम काही दिवसांमध्येच विघटित करू शकते. विशेष म्हणजे या प्रक्रियेत प्लास्टिकची पूर्ववत निर्मितीही करता येऊ शकते. अशा नव्या प्लास्टिकला संशोधक हाल एल्पर यांनी 'व्हर्जिन प्लास्टिक' असे नाव दिले आहे. याचा अर्थ मातीत मिसळलेल्या प्लास्टिकला त्याच्या मूळ रूपात आणले जाऊ शकते. सन 2005 पासून प्लास्टिकला लवकर डीकंपोज करण्यासाठी आतापर्यंत 19 एन्झाईम्स बनवण्यात आले आहेत; पण त्यामध्ये हे नवे एन्झाईम अधिक परिणामकारक व अनोखे आहे, असा संशोधकांचा दावा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news