आर्मेनियात सापडला 3200 वर्षांपूर्वीचा खजिना

आर्मेनियात सापडला 3200 वर्षांपूर्वीचा खजिना

येरेवान : आर्मेनियामध्ये पुरातत्त्व संशोधकांनी एका प्राचीन दफनभूमीत केलेल्या उत्खननावेळी 3200 वर्षांपूर्वीचा सोन्याचा खजिना शोधला आहे. याठिकाणी गेल्या अनेक शतकांच्या काळात चोरट्यांनी खोदकाम करून बराच खजिना लुटला आहे. मात्र तरीही तेथील एक मकबरा अनेक शतके सुरक्षित राहिला होता.

हा खजिना आर्मेनियात तुर्कीच्या सीमेजवळील मेट्समोर पुरातत्त्वीय स्थळाजवळ मिळाला आहे. इसवी सन पूर्व 400 ते इसवी सनाच्या 18 व्या शतकापर्यंत हे ठिकाण पूर्णपणे निर्जन होते. संशोधकांनी सांगितले की, मेट्समोरचा सर्वात जुना हिस्सा एका दफनभूमीत भिंतींच्या आड लपलेला होता. पोलिश आणि आर्मेनियन पुरातत्त्व संशोधकांच्या एका संयुक्त टीमने याठिकाणी उत्खनन करण्याचे ठरवले.

त्याठिकाणी दगडापासून बनवलेली एक कबर सापडली. त्याठिकाणी दोन व्यक्तींना दफन केले होते. हे सांगाडे दगडाने झाकलेले होते. हे सांगाडे स्त्री व पुरुषाचे आहेत. हे कदाचित दाम्पत्य असू शकते, ज्यांना इसवी सनपूर्व 1200 ते 1300 या काळात दफन केले असावे. वयाच्या तीस-चाळीस वर्षांच्या काळात दोघांचा मृत्यू झाला असावा. या दाम्पत्याच्या आसपास मोठाच खजिना होता. तिथे शंभरपेक्षा अधिक दागिने सापडले आहेत. त्यामध्ये सोन्याच्या अनेक पेंडंटचा समावेश आहे. गोल मोत्यासारखे सोन्याचे मणीही तिथे होते. लालसर रंगाची रत्ने या दागिन्यांना जडवलेली आहेत. एका सांगाड्याच्या मनगटावर कांस्य धातूपासून बनवलेले कडे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news