कानपूर : व्हेंटिलेटरची मागणी कोरोना काळात अनेक पटीने वाढली होती. एरव्हीही हे साधन रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत असते. आता कानपूर आयआयटी स्वस्त दरात व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत, आयआयटी कानपूरने अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित व्हेंटिलेटर 'व्ही 7 30 आय' तयार केला आहे, जो लवकरच केवळ आपल्या देशातच नव्हे तर युरोपियन देश आणि अमेरिकेतही विकला जाईल.
यासोबतच आयआयटी कानपूरने तयार केलेले पीपीई किट, मास्क अशा इतर मेडिकल साधनांची सुद्धा विक्री केली जाईल. आयआयटी कानपूरला ही वैद्यकीय साधने तयार करण्यासाठी युरोपीय देश आणि अमेरिकेकडून प्रस्ताव आला आहे. मात्र, या साधनांचा परदेशात पुरवठा करण्यापूर्वी त्याच्या सर्टिफिकेशन प्रोसेससाठी अंदाजे 2 वर्षे लागतील. त्यानंतर आयआयटी कानपूरच्या नोकार्क रोबोटिक्स कंपनीने तयार केलेली ही उत्पादने अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पाठवली जातील.
आयआयटी कानपूरच्या बायोलॉजिकल सायन्स आणि बायोइंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रोफेसर अमिताभ बंदोपाध्याय यांनी सांगितले की, 'कोरोना महामारीच्या गंभीर काळात आयआयटी कानपूरने अवघ्या 90 दिवसांत व्हेंटिलेटर तयार केले होते. या व्हेंटिलेटरमुळे केवळ भारतामधीलच नव्हे, तर जगातील अनेकांचे प्राण वाचले होते. तेव्हापासून ही संस्था सातत्यानं मेडिकल उपकरणे बनवण्याचे काम करत आहे.'
बंदोपाध्याय यांनी सांगितले की, 'आता आयआयटी कानपूरने अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून व्हेंटिलेटर तयार केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरपेक्षा ते खूपच स्वस्त आहे. त्याची किंमत जरी कमी असली तरी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. जर एखाद्या कंपनीच्या व्हेंटिलेटरची बाजारात किंमत 10 लाख असेल, तर आयआयटी कानपूरमध्ये तयार केलेला व्हेंटिलेटर 2 लाख रुपयांमध्ये मिळेल.'