

वॉशिंग्टन : जर तुम्ही युट्यूबवर व्हिडीओ पाहता पाहता फोनवर इतर कामेही करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युट्यूबचे सर्वात लोकप्रिय फिचर ‘पिक्चर-इन-पिक्चर’ (PiP) मोड आता जगभरातील सर्व अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.
या फिचरच्या मदतीने तुम्ही फोनवर दुसरे कोणतेही ॲप वापरत असतानाही युट्यूब व्हिडीओ पाहू शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर, व्हिडीओ सुरू असताना तुम्ही ‘होम बटण’ दाबले किंवा स्वाइप अप करून ॲपमधून बाहेर आलात, तरी व्हिडीओ बंद होणार नाही. त्याऐवजी, व्हिडीओ एका लहान ‘फ्लोटिंग विंडो’मध्ये (तरंगती स्क्रीन) सुरू राहील. ही स्क्रीन तुम्ही तुमच्या सोयीनुसार डिस्प्लेवर कुठेही सरकवू शकता. यामुळे व्हिडीओ पाहता पाहता ईमेल तपासणे किंवा व्हॉट्सॲपवर चॅटिंग करणे सहज शक्य होईल. युट्यूबने ही सुविधा मोफत दिली असली तरी, फी युजर्ससाठी एक अट ठेवली आहे.
ही सुविधा फक्त ‘नॉन-म्यूजिक’ कंटेंटसाठी (उदा. व्लॉग, पॉडकास्ट, बातम्या आणि ट्युटोरिअल्स) उपलब्ध असेल. जर तुम्हाला गाणी किंवा म्युझिक व्हिडीओ ‘पिक्चर-इन-पिक्चर’ मोडमध्ये पाहायचे असतील, तर त्यासाठी अजूनही ‘युट्यूब प्रीमियम’ सबस्क्रिप्शन असणे अनिवार्य आहे. प्रीमियम मेंबर्सना मात्र गाण्यांसह सर्व प्रकारच्या व्हिडीओंवर ही सुविधा आणि स्क्रीन बंद करून व्हिडीओ ऐकण्याचा फायदा मिळत राहील. हे अपडेट टप्प्याटप्प्याने रोलआउट होत असल्याने, जर तुमच्या फोनमध्ये अद्याप हे फिचर दिसत नसेल, तर थोडी प्रतीक्षा करा. फिचर उपलब्ध झाल्यावर असे सेटिंग करा : १. युट्यूब ॲपच्या सेटिंग्समध्ये जा. २. ‘जनरल’ पर्यायावर क्लिक करा. ३. तिथे ‘Picture- in- Picture’ चा टॉगल बटन दिसेल, तो ‘जप’ करा.