Epilepsy Patients Yoga Benefits | फिटस्‌च्या रुग्णांसाठी योगसाधना लाभदायक

मानसिक ताण होतो कमी; ‘एम्स’च्या शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण संशोधन
Epilepsy Patients Yoga Benefits  |
Epilepsy Patients Yoga Benefits | फिटस्‌च्या रुग्णांसाठी योगसाधना लाभदायक
Published on
Updated on

नवी दिल्ली : मिर्गी म्हणजेच अपस्मार किंवा फिटस्‌ येणे या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) शास्त्रज्ञांनी मिळून एक विशेष संशोधन केले आहे. या अभ्यासातून असे समोर आले आहे की, नियमित योगासने केल्याने मिर्गीच्या रुग्णांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. योगसाधनेमुळे रुग्णांचा मानसिक ताण तर कमी होतोच; शिवाय या आजाराबद्दल समाजात असलेल्या नकारात्मकतेमुळे रुग्णांच्या मनात निर्माण होणारी हीन भावनाही कमी होते.

या संशोधनात सहभागी झालेल्या रुग्णांनी नियमित योग केल्यानंतर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढल्याचे, त्यांना समाजात स्वीकारार्ह वाटू लागल्याचे आणि मानसिक आरोग्य सुधारल्याचे मान्य केले आहे. हा एक ‘रँडमाईज्ड कंट्रोल्ड ट्रायल’ प्रकारचा अभ्यास होता, ज्यामध्ये प्रौढ मिर्गी रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. संशोधकांनी या रुग्णांची दोन गटांत विभागणी केली : पहिला गट : या गटातील रुग्णांना एका ठराविक कालावधीसाठी नियमित योगासनांचे प्रशिक्षण देण्यात आले. दुसरा गट : या गटातील रुग्णांवर नेहमीप्रमाणे सामान्य वैद्यकीय उपचार सुरू ठेवण्यात आले.

या अभ्यासादरम्यान योगासनाचा रुग्णांच्या सामाजिक विचारसरणीवर, मानसिक आरोग्यावर आणि आजाराशी जोडलेल्या सामाजिक कलंकाच्या भावनेवर काय सकारात्मक परिणाम होतो, याचे मूल्यमापन संशोधकांनी केले. संशोधनाचे निष्कर्ष अतिशय सकारात्मक आणि आशादायक आहेत: हीन भावना झाली कमी : योग करणाऱ्या रुग्णांमध्ये मिर्गी या आजाराबद्दल वाटणारी लाज किंवा हीन भावना कमी झाल्याचे दिसून आले. भीती दूर झाली : समाजाकडून डावलले जाण्याची किंवा नाकारले जाण्याची भीती रुग्णांच्या मनातून लक्षणीयरीत्या कमी झाली. चिंता आणि ताणतणाव घटला : रुग्णांमधील मानसिक ताण आणि चिंतेची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली. जीवनमानाचा दर्जा सुधारला : रुग्णांचा आत्मविश्वास वाढला, सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग वाढला आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उत्तम झाला.

अपस्माराच्या रुग्णांसाठी तज्ज्ञांचा सल्ला :

नियमित योग आणि ध्यान करा : यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

औषधे कधीही सोडू नका : डॉक्टरांनी दिलेली औषधे दररोज एकाच निश्चित वेळेवर घ्या.

पूर्ण झोप घ्या : दररोज किमान ८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोप कमी झाल्यास फिटस्‌ येण्याचा धोका वाढतो.

व्यसनांपासून दूर राहा : दारू आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंद करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news