

बर्लिन : तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की एखादी कार जगातील सर्वात धोकादायक रेस ट्रॅकवर ड्रायव्हरशिवाय १८० मैल प्रति तास (सुमारे ३०० किमी/तास) पेक्षाही अधिक वेगाने धावू शकते? ऐकायला हे एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटातील दृश्यासारखे वाटते; परंतु स्मार्टफोन बनवणारी दिग्गज कंपनी ‘शाओमी’ने हा पराक्रम प्रत्यक्षात करून दाखवला आहे! शाओमीच्या Xiaomi YU7 GT या नवीन इलेक्ट्रिक कारने जर्मनीच्या प्रसिद्ध नर्बर्गिंग ट्रॅकवर कोणत्याही मानवी मदतीशिवाय एकटीने फेरी पूर्ण करून संपूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला थक्क केले आहे.
नुकत्याच झालेल्या एका चाचणीदरम्यान, या दमदार इलेक्ट्रिक कारने ड्रायव्हरशिवाय पूर्णपणे स्वतःच्या ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरच्या जोरावर ट्रॅकची फेरी पूर्ण केली. शाओमीसाठी आपल्या ऑटोनॉमस (स्वयंचलित) ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरची जगातील सर्वात कठीण रस्त्यांवर चाचणी घेण्याचे हे एक मोठे पाऊल आहे. कारच्या लाँचिंगनंतर लगेचच ही चाचणी घेण्यात आली, जेणेकरून कठीण रस्त्यांवर याचे सॉफ्टवेअर कसे काम करते, हे तपासता येईल. नर्बर्गिंग ट्रॅक हा अत्यंत वेगवान सरळ रस्ते, तीव्र चढ-उतार आणि अत्यंत धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या ऑटोनॉमस चाचणीत YU7 GT ने १० मिनिटे आणि २९.४८३ सेकंदात आपली फेरी (लॅप) पूर्ण केली. सॉफ्टवेअरने घेतलेला हा वेळ एका प्रोफेशनल मानवी ड्रायव्हरच्या तुलनेत थोडा जास्त होता. मानवी ड्रायव्हरच्या तुलनेत या ऑटोनॉमस फेरीला ३ मिनिटे ७ सेकंद अधिक लागले. मात्र, भविष्यात सॉफ्टवेअर अधिक चांगला आणि वेगवान बनवण्यासाठी ही चाचणी एक उत्तम डेटा बेस ठरेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
चीनच्या बाजारपेठेत Xiaomi YU7 GT ची सुरुवातीची किंमत ३,८९,९०० युआन (५४,३५,४४८ रुपये) आहे, तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ४,२९,९०० युआन (५९,७६,८३९ रुपये) इतकी आहे. सध्या ही कार फक्त चिनी बाजारातच लाँच करण्यात आली असून, ती भारतात कधी लाँच होणार याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Xiaomi YU7 GT मध्ये ८९७-व्होल्टचे सिलिकॉन कार्बाइड इलेक्ट्रिकल सिस्टम आणि १०१.७-kWh ची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.
ट्रॅकवर सतत हाय स्पीडमध्ये धावल्यानंतरही कारची परफॉर्मन्स अजिबात कमी होणार नाही, अशा पद्धतीने हिची रचना करण्यात आली आहे.
या कारमध्ये शाओमीचे ‘सुपर मोटर V8s EVO’ इंजिन बसवले आहे, जे ७३८ किलोवॅट म्हणजेच १,००३ हॉर्सपावरची प्रचंड पॉवर जनरेट करते.
ही SUV अवघ्या २.९२ सेकंदात ० ते १०० किमी/घंटा वेग पकडू शकते. याचा टॉप स्पीड १८६ मैल प्रति तास म्हणजेच सुमारे ३०० किमी/घंटा आहे.
हाय-स्पीड ड्रायव्हिंग आणि अचानक ब्रेक लावल्यामुळे बॅटरी आणि मोटर गरम होऊ नये, यासाठी यात ॲडव्हान्स कूलिंग सिस्टम दिली आहे.
ही कार अवघ्या १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये सुमारे ५७० किमी धावू शकते. एकदा फूल चार्ज झाल्यावर तिची सर्टिफाईड CLTC रेंज सुमारे ७०५ किमी आहे.