

इस्तंबुल : कधी कधी आपल्या शरीरातच काही अनाहुत पाहुणे येऊन ठाण मांडून बसतात आणि त्याची आपल्यालाच कल्पना असत नाही. कानात, नाकात काही कीटक गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आता तर डोळ्यातही असे कीटक जाऊन तिथे वाढूही शकतात याचे एक उदाहरण तुर्कीमधून समोर आले आहे. दहा वर्षांच्या एका मुलाच्या डोळ्यात असे किडे वाढत होते!
या मुलाच्या डोळ्यात खाज आणि वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यांची तपासणी केली असता त्याच्या पापण्यात किडे भरलेले आढळले. ही घटना तुर्कीच्या ताटवान शहरातील आहे. दहा वर्षांच्या चिमुकल्यासोबत घडलेली ही घटना वैद्यकीय शास्त्रासाठीही विचित्र घटना होती. याआधीही अशा घटना समोर आल्या असल्या तरी, शहरात राहणार्या एका चिमुकलीच्या बाबतीत मात्र यावेळी वेगळेच घडले. साधारणपणे शेतात काम करणार्या लोकांची किंवा नदीच्या काठावर राहणार्या लोकांची ही तक्रार असते; पण ही केस तर शहरात राहणार्या लोकांसाठी होती.
मुलाच्या डोळ्यात वेदना आणि खाज वाढली, म्हणून 5 जुलै रोजी त्याचे पालक त्याला ताटवन स्टेट हॉस्पिटल आय पॉलिक्लिनिकमध्ये घेऊन गेले. डॉ. हलील इब्राहिम अतेसोउलू यांनी या प्रकरणाचा अभ्यास केला आणि सांगितले की मुलाच्या डोळ्यांची तपासणी करताना त्यांना काहीतरी हलत असल्याचे दिसले. एक माशी त्याच्या डोळ्यात शिरून गेली होती, परंतु तिने तिच्या अळ्या त्याच्या पापण्यांमध्ये सोडल्या होत्या आणि त्यांनी पापण्यात आपलं घर केलं होतं. असे तब्बल अकरा लार्व्हा त्याच्या पापण्यांमध्ये होते. त्याची साफसफाई करणे हे खूप अवघड आणि बारकाईचे काम होते. परंतु, डॉक्टरांनी ते केले आणि या मुलाची अनाहूत पाहुण्यांपासून सुटका झाली!