World’s Oldest Orca | जगातील सर्वात वृद्ध नर ‘ऑर्का’ देवमाशाची ओळख पटली

वय ६५ वर्षांहून अधिक असल्याचा अंदाज
World’s Oldest Orca |
Oldest Male Orca | जगातील सर्वात वृद्ध नर ‘ऑर्का’ देवमाशाची ओळख पटली
Published on: 
Updated on: 

लंडन : मागील काही दशकांमध्ये झालेल्या अणुबॉम्ब चाचण्यांमधून बाहेर पडलेल्या किरणोत्सर्गी (रेडिओॲक्टिव्ह) अवशेषांमुळे आतापर्यंतचा सर्वात वयोवृद्ध नर ‘ऑर्का’ (किलर व्हेल) देवमासा शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. एका नवीन संशोधनातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

स्कॉटलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांत मृतावस्थेत वाहून आलेल्या ‘ऑर्का’ (Orcinus orca) आणि 'स्पर्म व्हेल’ (Physeter macrocephalus) देवमाशांच्या दातांमध्ये मागील दशकांतील अणुचाचण्यांचे किरणोत्सर्गी अवशेष सुरक्षित राहिले होते. या अवशेषांच्या तपासणीतून शास्त्रज्ञांना हा महत्त्वाचा निष्कर्ष काढता आला आहे. ‘स्कॉटिश युनिव्हर्सिटीज एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च सेंटर’चे संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक किरण टियर्नी यांनी सांगितले की, ‘या किरणोत्सर्गी अवशेषांमुळे आम्हाला एक प्रकारचा ‘बॉम्ब पल्स’ (काळाचा अचूक मागोवा घेणारा पुरावा) मिळतो.’ साधारणपणे नर ऑर्का देवमाशांचे कमाल आयुर्मान ५० ते ६० वर्षे असते, असे मानले जाते. मात्र, १ ऑक्टोबर रोजी ‘फ्रंटियर्स इन मरीन सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, किनाऱ्यावर वाहून आलेल्या एका नर ऑर्काच्या दातांमधील रेडिओकार्बन खुणांवरून त्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

रेडिओकार्बन डेटिंगच्या या माहितीवरून देवमाशाचे अगदी अचूक वय सांगता येत नसले, तरी हा अंदाज अशक्यप्राय नसल्याचे संशोधकांच्या पथकाने स्पष्ट केले आहे. निसर्गातील प्राण्यांचे कमाल आयुर्मान मोजणे अत्यंत कठीण असते. प्रत्येक प्राण्यावर लक्ष ठेवून कोणत्या प्रजातीतील कोणता जीव सर्वाधिक काळ जगतो हे पाहणे संशोधकांना शक्य नसते. तसेच, ऑर्का देवमाशांच्या दीर्घायुष्याबाबत जगभरात फारशी विस्तृत नोंद उपलब्ध नाही. ‘आययूसीएन इम्पॉर्टंट मरीन मॅमल एरिया स्पेशालिस्ट ग्रुप’चे सहअध्यक्ष आणि ‘ऑर्का: द व्हेल कॉल्ड किलर’ या पुस्तकाचे लेखक एरिक होयट (जे या संशोधनाचा भाग नव्हते) यांनी या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.