

हैदराबाद : जगातील सर्वात मोठे सोन्याचे नाणे मुघल बादशहा जहांगीरने तयार करवून घेतले आहे. जहांगीरने याचा उल्लेख तुज्क-ए-जहांगीर या आपल्या आत्मकथेतही केला होता, असे मानले जाते. वास्तविक, सोने हा एक असा धातू आहे, जो जगभरात कुठेही मिळेल. भारतात तर सोन्याची इतकी क्रेझ आहे की, कोणत्याही राज्यात गेले तरी निश्चितपणाने तेथे सोन्याचे अमाप दागिने आढळून येतील. केवळ दागिनेच नव्हे तर सोन्याची नाणीदेखील असतात आणि त्याच्या संग्रहाचा अनेकांना छंद असतो. पण, जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या नाण्याची क्वचितच सर्वांना कल्पना असेल.
ज्ञात माहितीनुसार, जगातील सर्वात मोठे सोन्याचे नाणे मुघल बादशहाने तयार करवून घेतले होते. ते इतकी वजनी होते की, लहान किंवा दुबळ्या व्यक्तीला ते उचलणेही कठीण झाले असते. मुघल बादशहाने 1 हजार तोळ्याच्या शुद्ध सोन्यात दोन नाणी घडवून घेतली होती आणि ही नाणी त्यांनी इराणच्या राजदुताला भेट दिली होती. सर्वात अखेरीस हे नाणे हैदराबादचे आठवे निजाम मुकर्रमकडे पाहण्यात आले होते.
1980 च्या दशकात मुकर्रमने दिवाळखोरीला सामोरे जावे लागल्याने सदर नाणे स्विस बँकेत विकण्याचा प्रयत्न केला होता. सीबीआयने त्यावेळी त्याची चौकशी केली होती. पण, त्यावेळी ते नाणे आढळून आले होते. मुकर्रम हे त्यावेळी नाममात्र निजाम होते आणि त्यांना हे नाणे हैदराबादचे शेवटचे निजाम व त्यांचे आजोबा मीर ओसमान अली यांच्याकडून प्राप्त झाले होते.
जहांगीरनी हे नाणे तब्बल 400 वर्षांपूर्वी तयार केले असल्याचा अंदाज आहे. भारत सरकारने हे नाणे शोधण्यासाठी नव्याने चौकशी सुरू केली असून त्याचे वजन 12 किलो इतके असल्याचा होरा आहे. या नाण्याच्या मधोमध जहांगीरचे नाव लिहिले आहे. आजच्या हिशेबाने या नाण्याची किंमत सात कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे मानले जाते.