Highest-Paid Prime Minister | जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या पंतप्रधानांच्या वेतनात आणखी वाढ

Highest-Paid Prime Minister |
Highest-Paid Prime Minister | जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या पंतप्रधानांच्या वेतनात आणखी वाढ
Published on
Updated on

सिंगापूर : जगातील सर्वाधिक वेतन घेणारे पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या वेतनात आता मोठी वाढ होणार आहे. मंगळवारी (८ सप्टेंबर) त्यांनी संसदेत माहिती दिली की, सिंगापूर आपल्या राजकीय नेत्यांच्या वेतनात वाढ करणार आहे. यामुळे त्यांच्या पगारात ६० टक्क्यांहून अधिक वाढ होईल, जो आधीच जगभरातील सर्व मंत्र्यांमध्ये सर्वाधिक आहे. मंत्र्यांचा पगार वाढवण्याबाबत सिंगापूरचे असे म्हणणे आहे की, यामुळे उत्तम प्रतिभा राजकारणाकडे आकर्षित होते आणि सुशासन देण्यास मदत होते.

सिंगापूरमध्ये मंत्र्यांचे वेतन सामान्य नागरिकांच्या तुलनेत खूप जास्त आहे. पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी सांगितले की, या वेतनवाढीनंतर त्यांचे वार्षिक बेंचमार्क वेतन २.२ दशलक्ष सिंगापूर डॉलर (सुमारे १६.४९ कोटी रुपये) वरून वाढून ३.६ दशलक्ष सिंगापूर डॉलर म्हणजेच सुमारे २७.०१ कोटी रुपये होईल. त्याचप्रमाणे, उपपंतप्रधानांचे बेंचमार्क वेतन १.८७ दशलक्ष सिंगापूर डॉलर (१४.०३ कोटी रुपये) वरून वाढून ३.०६ दशलक्ष सिंगापूर डॉलर (२२.९५ कोटी रुपये) होईल. तर कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार आणि खात्यांच्या महत्त्वाच्या आधारावर १.८० दशलक्ष सिंगापूर डॉलर (१३.५० कोटी रुपये) ते २.८८ दशलक्ष सिंगापूर डॉलर (२१.६० कोटी रुपये) दरम्यान वेतन मिळेल.

पंतप्रधानांच्या या मोठ्या वेतनवाढीमुळे सिंगापूरमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे. यावर वोंग यांनी घोषणा केली आहे की, ते त्यांच्या कार्यकाळादरम्यान पुढील ५ वर्षे वाढलेला सर्व पगार सामाजिक कार्यासाठी (चॅरिटी) दान करतील. वेतनवाढीपूर्वीही सिंगापूरच्या पंतप्रधानांचे वेतन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह G7 देशांतील नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. यावर बोलताना वोंग म्हणाले, ‘राजकीय नेत्यांचे वेतन हा एक संवेदनशील आणि भावनिक विषय आहे. यात समाविष्ट असणारी रक्कम बहुतांश नागरिकांच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे सिंगापूरचे नागरिक यावर बारीक लक्ष ठेवतात आणि या विषयाला गांभीर्याने घेतात, हे मी समजू शकतो.’ आग्नेय आशियाई देश असलेल्या सिंगापूरने तब्बल १५ वर्षांनंतर आपल्या मंत्र्यांच्या वेतनात सुधारणा केली आहे.

हा देश जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांपैकी एक मानला जातो. ही नवीन वेतनवाढ १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होईल. तुलना करायची झाल्यास, जगातील शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वार्षिक ४ लाख अमेरिकन डॉलर (सुमारे ३.३ कोटी रुपये) पगार मिळतो. तर ब्रिटनच्या पंतप्रधानांना सुमारे १.९ कोटी रुपये, हाँगकाँगच्या चीफ एक्झिक्युटिव्हना सुमारे ६ कोटी रुपये आणि स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांना वार्षिक सुमारे ५ कोटी रुपये पगार मिळतो. दुसरीकडे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे वार्षिक वेतन ६० लाख रुपये आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक वेतन सुमारे २० लाख रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news