

लंडन : सोनेरी केस असलेले लहान मूल मोठे होत असताना त्याचे केस हळूहळू काळे किंवा गडद तपकिरी रंगाचे होत असल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा केवळ भास नाही. अनेक मुलांच्या बाबतीत अगदी लहानपणी असलेले प्लॅटिनम सोनेरी केस वयानुसार बदलतात आणि मोठे झाल्यावर गडद तपकिरी किंवा अगदी काळेही होतात. थोडक्यात सांगायचे, तर केसांचा रंग हा जनुके, रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी आणि लहानपणानंतर शरीरात निर्माण होणारे हार्मोन्स यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांवर अवलंबून असतो. केसांच्या रंगासाठी जबाबदार असलेल्या अनेक जनुकांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे; मात्र काही मुलांचे सोनेरी केस मोठेपणी काळे होतात आणि इतरांचे केस आयुष्यभर सोनेरीच का राहतात, याचा शोध अजूनही घेतला जात आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनचे त्वचाशास्त्र (Dermatological Science) विषयाचे प्राध्यापक डेसमंड टोबिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे सर्व मुलांच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते.’ केसांच्या मुळांमध्ये असलेल्या ‘मेलेनोसाईटस्’ नावाच्या विशेष पेशी ‘मेलेनिन’ नावाचे रंगद्रव्य तयार करतात. या मेलेनिनमुळेच केसांना विशिष्ट रंग मिळतो. मेलेनिनचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात : युमेलेनिन (Eumelanin) : यामुळे केसांना गडद तपकिरी किंवा काळा रंग मिळतो. फेओमेलेनिन (Pheomelanin) : यामुळे केसांना पिवळसर आणि लालसर छटा मिळते. केसांच्या मुळांमधून किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारचे मेलेनिन तयार होते, यावरून उगवणाऱ्या केसांचा रंग ठरतो. सामान्यतः, युमेलेनिनचे प्रमाण जितके जास्त, तितके केस जास्त गडद असतात.
उदाहरणार्थ, गरोदरपणाच्या काळात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्याने युमेलेनिनचे उत्पादन वाढते आणि केस अधिक गडद होतात. केसांच्या मुळांची कार्यक्षमता संपूर्ण बालपणात एकसारखीच राहते असे नाही. मूल जसे मोठे होते, तसतसे रंगद्रव्य उत्पादनावर नियंत्रण ठेवणारे जैविक संकेतही बदलतात. प्राध्यापक टोबिन यांच्या मते, सोनेरी केस असलेल्या मुलांमध्ये वयाच्या १० ते १३ वर्षांच्या दरम्यान (प्युबर्टी/पौगंडावस्थेच्या काळात) केसांचा रंग गडद होण्याचा बदल प्रामुख्याने दिसून येतो. पौगंडावस्थेत शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे (उदा. एस्ट्रोजन आणि अँड्रोजन) युमेलेनिनचे उत्पादन वाढते. यामुळेच वेळेनुसार सोनेरी केस हळूहळू गडद होऊ लागतात. टोबिन पुढे म्हणाले, ‘ज्यांचे केस आयुष्यभर सोनेरी राहतात, त्यांच्यात जनुकीय रचनेनुसारच युमेलेनिन रंगद्रव्याची निर्मिती कमी प्रमाणात होते.’ मात्र, संप्रेरकांमुळे हा बदल नक्की कसा घडून येतो, याचे रहस्य पूर्णपणे उलगडणे शास्त्रज्ञांना अजूनही बाकी आहे.