

बर्लिन : एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस, अशा सोहळ्यांना रंगत येते ती केकमुळेच आणि केक म्हटले तर सर्वप्रथम नाव येईल ब्लॅक फॉरेस्ट! कोणत्याही केक शॉपमध्ये हा केक सहजपणे मिळतो. ब्लॅक फॉरेस्टनंतर नाव येईल व्हॉईट फॉरेस्ट, पण आता केकच्या नावात फॉरेस्ट अर्थात जंगल कसे आले, असा प्रश्न येईल आणि याची कथाही रंजक आहे.
हा केक 1500 च्या दशकात प्रथमच बनवला गेला होता, असे मानले जाते. युरोपमध्ये चॉकलेट उपलब्ध झाले, त्यावेळी या केकची सुरुवात झाली, असे मानतात. आंबट चेरी आणि किर्शवासर (चेरीपासून बनवलेली ब्रँडी) यासाठी ओळखल्या जाणार्या जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्टमध्ये याची निर्मिती झाल्याचे म्हटले जाते.
केकमध्ये वापरल्या जाणार्या चेरी पारंपरिक जर्मन टोपींवरील लाल पोम-पोम्ससारख्या असतात म्हणून त्याचे नाव ब्लॅक फॉरेस्ट ठेवण्यात आले, असेही सांगितले जाते. मात्र, 'ब्लॅक फॉरेस्ट' हे नाव गडद, सावलीच्या जंगलाचे प्रतीक आहे, केकला हे नाव देण्यामागे हे एक कारण देखील असू शकते, याचाही काही ठिकाणी उल्लेख आहे.
जगात अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत, त्यापैकी एक ब्लॅक फॉरेस्ट हे आहे. हे जंगल जितके सुंदर आहे तितकेच रहस्यांनी भरलेले आहे. या जंगलातील झाडे इतकी दाट आहेत की सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून त्याला 'ब्लॅक फॉरेस्ट' असे म्हणतात. हे अतिशय सुंदर जंगल जर्मनीमध्ये आहे. जे समुद्रसपाटीपासून सुमारे 4898 फूट उंचीवर आहे. हे घनदाट काळे जंगल केवळ जर्मनीच्या लोकांसाठीच नाही तर आजूबाजूच्या लोकांसाठीही खास आहे. या जंगलात गेल्यावर दिवस सुद्धा रात्रीसारखा वाटतो. त्यामुळेच हे जंगल ब्लॅक फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते आणि त्यावरूनच केकला देखील ब्लॅक फॉरेस्ट या नावाने ओळखले जाते.