बटर चिकन पहिल्यांदा कोण बनवले? कोर्टात पोहोचला वाद!

बटर चिकन पहिल्यांदा कोण बनवले? कोर्टात पोहोचला वाद!

नवी दिल्ली : रसगुल्ला नेमका कुठे प्रथम तयार झाला यावरून प. बंगाल आणि ओडिशामध्ये रंगलेला वाद अनेकांना आठवत असेल. आता अशाच प्रकारे बटर चिकन पहिल्यांदा कुणी बनवले हा वाद निर्माण झालेला आहे. भाजलेले चिकन टोमॅटोच्या क्रिमी आणि लोण्यासारख्या मऊ ग्रेव्हीत शिजवले, त्यात हात आखडता न घेता बटर टाकले की तयार होते, लाखो खवय्यांची आवडती डिश, बटर चिकन! भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर ही डिश संपूर्ण जगात पसरली. तिने भारतीय खाद्यसंस्कृतीला नवी ओळख दिली, पण आता स्वतःचीच ओळख कोणती हे सिद्ध करण्यासाठी बटर चिकन सध्या कोर्टकचेरीच्या फेर्‍यात अडकली आहे. ही खास डिश आमच्याच हॉटेलमध्ये अगोदर तयार झाल्याचा दावा करत दोन मित्रांच्या आताच्या पिढ्या न्यायालयीन लढाई लढत आहेत.

बटर चिकनचा शोध लावला तरी कोणी? असा गंभीर प्रश्वन खवय्यांना कधी पडला नाही. कारण ताव मारण्यात आणि पेटपूजेतून त्यांना कुठली आलीये फुरसत? पण जुन्या दिल्लीतील दोन हॉटेल मात्र आम्हीच या डिशचे जनक आहोत हे सिद्ध करण्यासाठी भांडत आहेत. दिल्लीतील 'मोती महल' आणि 'दरियागंज' ही दोन्ही रेस्टॉरंट एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. बटर चिकनचा शोध आम्हीच लावला असा त्यांचा दावा आहे. भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर 1950 मध्ये पेशावर येथील कुंदन लाल जग्गी आणि कुंदन लाल गुजराल हे दोन मित्र दुःख उराशी कवटाळत भारतात आले. या दोघांनी हॉटेल उघडले. त्यात बटर चिकन या लोकप्रिय डिशचा जन्म झाला.

गुजराल यांनी 1997 मध्ये तर कुंदन लाल जग्गी यांनी 2018 मध्ये शेवटचा श्वास घेतला. आता त्यांच्या वारसांमध्ये बटर चिकनच्या मालकीवरून वाद दिल्ली हायकोर्टात पोहोचला. मोती महल हॉटेलच्या मालकाने दरियागंजच्या मालकाकडे 2.40 लाख डॉलर म्हणजे भारतीय चलनात 2 कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे. दरियागंजच्या मालकाने त्यांच्या टॅगलाईनमध्ये एक आगाऊपणा केल्याचा दावा मोती महलच्या मालकाने केला आहे. त्यानुसार या टॅगलाईनमध्ये बटर चिकनचा जनक, शोध त्यांच्या हॉटेलने लावल्याचा दावा केला आहे. कोर्टात या लढाईला आता एक नवीन वळण लागले आहे. दोन्ही बाजूंकडून पुराव्यांचे बाड न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news