

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ‘आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीय म्हणू नका’ या आपल्या निरागस आवाहनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या चिमुकल्या टिंकलचा आणखी एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहे. अरुणाचल प्रदेशातील ईटानगर येथे राहणाऱ्या ४ वर्षांच्या टिंकल गोंगो हिचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संभाषण झाले. या संभाषणात टिंकलने कोणताही संकोच न बाळगता रिजिजू यांना ‘तुम्ही कोण आहात?’ असा थेट प्रश्न विचारला.
व्हिडीओ कॉलदरम्यान टिंकलच्या आईने फोन धरून तिची रिजिजू यांच्याशी भेट घडवून आणली. किरण रिजिजू यांनी स्वतःची ओळख करून देत आपले नाव सांगितले. त्यानंतर टिंकलने तिच्या लहान भावाकडे बोट दाखवत ‘हा निबू आहे’ असे म्हटले, ज्यावर रिजिजू मनमोकळेपणाने हसले. संभाषणादरम्यान रिजिजू यांनी तिला विचारले, ‘तू दिल्लीला येणार का? माझ्यासोबत जेवणार का?’ त्यावर टिंकलने लगेचच होकार दिला. संभाषण संपवताना तिने त्यांना ‘बाय’ करत दोन्ही हातांनी ‘हार्ट’ करून दाखवले. चिमुकलीच्या या निरागसतेवर रिजिजू पुन्हा एकदा हसून दाद देताना दिसले.
या व्हिडीओमधील आपुलकी आणि निष्पापपणा पाहून नेटकरी या संभाषणाच्या प्रेमात पडले आहेत. अनेक जण या व्हिडीओवर कमेंटस् करत टिंकलवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर केंद्रीय मंत्र्यांच्या या नम्र आणि प्रेमळ स्वभावाचेही कौतुक होत आहे. ईटानगरची ४ वर्षांची टिंकल गोंगो एका व्हिडीओमुळे देशभरात प्रसिद्धीझोतात आली होती. सोशल मीडियावर काही लोकांनी तिच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून तिला ‘चायनीज’ म्हटले होते. यावर टिंकलने अत्यंत निरागस पण स्पष्ट शब्दांत, ‘मला चायनीज म्हणू नका, मी भारतीय आहे,’ असे ठणकावून सांगितले होते. तसेच, असे ऐकून मला वाईट वाटते, असेही ती म्हणाली होती.
तिच्या या वक्तव्यामुळे पूर्वोत्तर (ईशान्य) भारतातील नागरिकांकडे पाहण्याच्या संकुचित दृष्टिकोनावर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली होती. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू हे स्वतः अरुणाचल प्रदेशातील ‘अरुणाचल पश्चिम’ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आपल्याच राज्यातील या लहान मुलीची निरागसता आणि तिने दिलेल्या संदेशाचे कौतुक करण्यासाठी त्यांनी खास तिच्याशी संपर्क साधून संवाद साधला.