Tomb of Alexander : कुठे आहे ‘जगज्जेता’ अ‍ॅलेक्झांडरचा मकबरा?

Tomb of Alexander : कुठे आहे ‘जगज्जेता’ अ‍ॅलेक्झांडरचा मकबरा?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : 'अ‍ॅलेक्झांडर द ग्रेट' ने (Tomb of Alexander) जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते; मात्र भारताच्या वेशीपासूनच तो परत गेला व वाटेतच मृत्युमुखी पडला. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी मृत्युमुखी पडलेल्या या तरुण सम्राटाचा मकबरा नेमका कुठे आहे हे अद्याप समजलेले नाही. बाल्कन देशांपासून सध्याच्या पाकिस्तानपर्यंतचा अनेक भूभाग अ‍ॅलेक्झांडरने जिंकून घेतला होता. मात्र, चेंगिज खानाचे थडगे जसे अज्ञात आहे तसेच अ‍ॅलेक्झांडरचेही थडगे कुठे आहे याची कुणालाही कल्पना नाही!

या महान मॅसेडोनियन योद्ध्याचा बॅबिलॉनमध्ये इसवी सनपूर्व 323 मध्ये मृत्यू झाला. (Tomb of Alexander) त्याच्या मृत्यूनंतर काही काळातच त्याचे साम्राज्यही भंगले. त्याच्या अनेक सरदार व प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपापल्या ताब्यात असलेले भूभाग बळकावण्यासाठी या साम्राज्याचे तुकडे केले. ख्रिस नौंटन नावाच्या इजिप्टोलॉजिस्टनी 'सर्चिंग फॉर द लॉस्ट टॉम्ब्स ऑफ इजिप्त' नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते इंग्लंडमधील रॉबर्ट अँडरसन रिसर्च चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक आहेत.

त्यांनी म्हटले आहे की अ‍ॅलेक्झांडरचा एक सरदार टॉलेमी याने इसवी सनपूर्व 321 मध्ये अ‍ॅलेक्झांडरचा मृतदेह मिळवून तो इजिप्तच्या मेम्फीस येथे आणला होता! सध्याच्या कैरोजवळ हे प्राचीन इजिप्शियन शहर होते. तिथेच अ‍ॅलेक्झांडरचा देह ठेवण्यात आला होता असे सुचवणार्‍या काही ऐतिहासिक नोंदी आहेत. कालांतराने अ‍ॅलेक्झांड्रिया येथे त्याचा मकबरा बांधण्यात आला व तिथे त्याचा देह ठेवण्यात आला. हे नेमके कधी घडले हे स्पष्ट नाही, मात्र काही दशकांच्या काळानंतर हे घडले असावे, असे नौंटन यांचे म्हणणे आहे.

इसवी सनपूर्व तिसर्‍या शतकाच्या अखेरीस अ‍ॅलेक्झांड्रियामध्येच त्याचा आणखी एक मकबरा बांधला गेला. त्याला 'सेमा' किंवा 'सोमा' असे नाव आहे. या ठिकाणी त्याला अखेरच्या वेळेस ठेवण्यात आले असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा शेवटचा मकबरा नेमका कुठे आहे याची कुणालाही माहिती नाही. कदाचित हे ठिकाण सध्या पाण्याखाली गेलेले असावे असे म्हटले जाते. इंग्लंडच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीतील प्रा. अँड्र्यू इरस्किन यांच्या म्हणण्यानुसार अ‍ॅलेक्झांडरचा मकबरा अ‍ॅलेक्झांड्रियाच्या महालाच्या आवारात टॉलेमीच्या आसपास असावा. मात्र, त्याचे नेमके ठिकाण माहिती नाही. त्याचा मकबरा कदाचित कधीही सापडणार नाही असे नौंटन यांना वाटते!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news