ISRO Moon Base | चंद्रावर ‘मुन बेस’ उभारण्यात इस्त्रोची भुमिका काय असेल?

ISRO Moon Base |
ISRO Moon Base | चंद्रावर ‘मुन बेस’ उभारण्यात इस्त्रोची भुमिका काय असेल?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने चंद्रावर मानवासाठी एक कायमस्वरूपी तळ किंवा केंद्र (Permanent Moon Base) उभारण्याच्या योजनेत भारताला सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. चंद्रयान-३ च्या ऐतिहासिक यशानंतर या विशाल मून बेस प्रोजेक्टमध्ये भारताची नेमकी भूमिका काय असू शकते आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (ISRO) याचे काय महत्त्व आहे, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.

‘नासा’चा उद्देश केवळ मानवाला चंद्रावर पाठवून परत आणणे एवढाच नाही, तर चंद्रावर असा एक बेस तयार करणे आहे जिथे मानव दीर्घकाळ राहून संशोधन करू शकेल. या बेसमध्ये रोव्हर, लँडर, रोबो, सोलर पॉवर सिस्टीम आणि कम्युनिकेशन सिस्टीम यांसारख्या गोष्टी असतील. हळूहळू तिथे मानवाच्या राहण्यासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जातील. हे संपूर्ण काम एकाच वेळी न होता अनेक टप्प्यांत पार पडेल आणि यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. नासा आणि इतर अंतराळ संस्थांचे लक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असण्याचे मुख्य कारण म्हणजे तिथे असलेले बर्फाच्या स्वरूपातील पाणी.

चंद्राच्या या भागात असे अनेक खोल खड्डे आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून सूर्याचा प्रकाश पोहोचलेला नाही. जर या बर्फापासून पाणी बनवता आले, तर त्याचा वापर पिण्यासाठी करता येईल. तसेच पाण्याचे विघटन करून ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळवता येईल. हायड्रोजनचा वापर भविष्यात रॉकेट इंधन म्हणून होऊ शकतो. दक्षिण ध्रुवाच्या काही उंच भागांवर दीर्घकाळ सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे सोलर पॅनेल लावून वीज तयार करणे सोपे होईल. चंद्रावर मानवासाठी बेस उभारणे ऐकायला जितके सोपे वाटते, तितकेच ते कठीण आहे. चंद्रावरील वातावरण पृथ्वीसारखे नसून तिथे तापमानात प्रचंड चढ-उतार होतात.

शिवाय, तिथली धूळ म्हणजेच ‘लुनार डस्ट’ ही अत्यंत सूक्ष्म आणि चिकट असते, जी यंत्रे, स्पेस सूट आणि सोलर पॅनेलसाठी अडथळा ठरते. त्यामुळे तिथे दीर्घकाळ टिकणाऱ्या अत्यंत मजबूत तंत्रज्ञानाची गरज आहे. जर भारत या प्रकल्पात सहभागी झाला, तर भारतीय शास्त्रज्ञ आणि खासगी अंतराळ कंपन्यांसाठी अनेक नव्या संधी उपलब्ध होतील. भारतीय कंपन्या रोबो, सेन्सर्स, कम्युनिकेशन सिस्टीम आणि इतर आवश्यक तंत्रज्ञान बनवण्यात योगदान देऊ शकतील. याशिवाय, भविष्यात चंद्रावरील संसाधनांच्या वापराबद्दल जे जागतिक नियम बनतील, त्यात भारत आपली बाजू अधिक सक्षमपणे मांडू शकेल. हा प्रकल्प एक-दोन वर्षांत पूर्ण होणारा नसून यात अनेक दशके लागू शकतात. आपल्या तंत्रज्ञानानुसार आणि बजेटनुसार भारत यात किती मोठी भूमिका बजावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, ‘नासा’च्या या योजनेत समाविष्ट होण्याची संधी मिळणे हेच भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी एक मोठे पाऊल आहे.

भारताला आमंत्रण का मिळाले?

भारताने गेल्या काही वर्षांत चंद्र मोहिमांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. चंद्रयान-१ मोहिमेने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर चंद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे, रोव्हर चालवणे आणि अत्यंत कमी खर्चात अंतराळ मोहिमा राबवण्याचा उत्तम अनुभव इस्रोकडे आहे. म्हणूनच भारताला या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये एक महत्त्वाचा भागीदार मानले जात आहे.

भारताची भूमिका निश्चित झाली आहे का?

‘नासा’चे आमंत्रण मिळणे आणि भूमिका निश्चित होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्या भारताला मून बेसचा कोणता विशिष्ट भाग बनवण्याची जबाबदारी मिळाली आहे असे नाही. आगामी चर्चांमधून भारत या प्रकल्पात कसा योगदान देईल हे स्पष्ट होईल. भारत रोबोटिक्स, चंद्राच्या पृष्ठभागाचे मॅपिंग, पाण्याचा शोध, डेटा आणि पॉवर सिस्टीम यांसारख्या क्षेत्रांत मदत करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news