

नवी दिल्ली : अनेक लोक भजी, पकोड्यांपासून ते पिझ्झा, बर्गरपर्यंत अनेक पदार्थ खात असताना सोबत टोमॅटो सॉस किंवा केचपचा वापर करीत असतात. चायनीज असो किंवा समोसा, अनेक वेळा सॉस किंवा केचप वेटरकडे मागून घेतले जात असते. मात्र, सॉस व केचपमधील फरक अनेकांना समजत नाही. अनेकांना ही दोन्ही एकच आहेत असे वाटत असते! अर्थातच तसे नसते.
या दोन्ही पदार्थांमध्ये एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे केचप तयार करण्यासाठी टोमॅटोंचाच वापर होतो. सोबतच साखर आणि काही आंबट-गोड मसाले टाकून त्याला घट्ट केले जात असते. हे तयार करण्यासाठी ते गरम करण्याचीही गरज नसते. केचपमध्ये व्हिनेगार किंवा अॅसिटिक अॅसिड तसेच विविध मसाले वापरले जातात. दुसरीकडे सॉस तयार करण्यासाठी टोमॅटोच हवेत असे नसते. सॉस हा टोमॅटोऐवजी अन्यही काही गोष्टींपासून बनवला जाऊ शकतो. सॉसमध्ये तेलाचाही वापर होतो. तसेच व्हेजिटेबल किंवा अन्य प्रकारचे स्टॉकही वापरता येऊ शकतात. त्यामध्ये व्हिनेगारचा कधीही वापर होत नाही. टोमॅटो केचपमध्ये 25 टक्के साखर असू शकते, मात्र सॉसमध्ये साखर नसते व केवळ मसाले टाकले जातात. केचपला काही लोक सॉसचे 'मॉडर्न व्हर्जन'ही म्हणतात, जे टोमॅटोपासून तयार होते. सॉस थोडा अधिक पातळसर असतो. तो जेवणाची चव वाढवण्यासाठी सोबत दिला जातो. टोमॅटोच्या चटणीलाही आपण सॉस म्हणू शकतो. मात्र, केचप चटणी नाही! या दोन्हीमध्ये सर्वात मोठा फरक हा असतो की केचपमध्ये साखर असते व सॉसमध्ये नसते.