निएंडरथल, होमो सेपियन्सची होती एकच प्रजाती?

निएंडरथल, होमो सेपियन्सची होती एकच प्रजाती?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आधुनिक मानव हा 'होमो सेपियन्स' या प्रजातीपासून विकसित झाला असे मानले जाते. मात्र, ही एकच मनुष्य प्रजाती अस्तित्वात होती असे नाही. निएंडरथलसारख्या अन्यही काही प्रजाती अस्तित्वात होत्या. मात्र, आता काही संशोधकांना निएंडरथल ही वेगळी प्रजाती होती असे वाटत नाही. केवळ 40 हजार वर्षांपूर्वीच निएंडरथल प्रजाती लुप्त झाली होती. निएंडरथल माणसाचे जीवाश्म 1800 मध्ये मिळाले होते. त्यावेळेपासूनच ही एक वेगळीच प्रजाती आहे की आपल्या होमो सेपियन्स याच प्रजातीची उपशाखा आहे यावर चर्चा सुरू झाली होती.

आता याबाबत विज्ञान काय म्हणते हे पाहणे महत्त्वाचे ठरते. विशेषतः जनुकीय पुरावे काय सांगतात हे महत्त्वाचे आहे. पिटस्बर्ग युनिव्हर्सिटीतील अँथ्राेपोलोजिस्ट जेफ श्वार्त्झ यांनी सांगितले, एखादी 'स्पेसीज' (प्रजाती) म्हणजे नेमके काय असते याबाबत सध्याच्या ज्या आपल्या प्रचलित धारणा आहेत त्यामुळेच निएंडरथल हे आधुनिक मानवाच्याच प्रजातीचे होते की नाही हे समजून घेण्यात गुंतागुंत निर्माण झालेली आहे. सध्याच्या व्याख्येप्रमाणे एका प्रजातीमध्ये अंतर्गतच नैसर्गिक प्रजनन होऊन त्या प्रजातीची वैशिष्ट्ये असलेली अपत्ये उत्पन्न होतात. मात्र, आताही अनेक अनाहूत हायब्रीड किंवा संकर या व्याख्येला छेद देत असतात. घोडा आणि गाढव यांच्यामध्ये प्रजनन होते; पण त्यांच्यापासून निर्माण झालेली संतती अप्रजननक्षम असते. त्यामुळे या दोन वेगळ्याच प्रजाती आहेत हे सिद्ध होते.

बरीच वर्षे संशोधकांना हे माहिती नव्हते की निएंडरथल व होमो सेपियन्समध्ये शारीरिक संबंधही निर्माण झालेले होते. त्यांच्यापासून उत्पन्न झालेली माणसं पुढेही आपला वंश वाढवत होती. त्यामुळे या दोन वेगळ्याच प्रजाती होत्या असे म्हणणे तितकेसे योग्य वाटत नाही. या दोन प्रजातींच्या शरीररचनेचा (अ‍ॅनाटोमी) विचार करता काही संशोधकांना या दोन्हींच्या हाडांमध्ये फरक आहे असे वाटते. निएंडरथलची कवटी लांबट व बसकट होती. तसेच त्यांचे कपाळ अधिक भरीव होते. त्यांची हनुवटी पुढे आलेली नव्हती तर आतली बाजूस वळलेली होती. हे सर्व होमो सेपियन्सच्या तुलनेतील वेगळेपण आहे. त्यामुळे सन 1864 मध्ये निएंडरथलना वेगळी प्रजाती ठरवण्यात आले होते.

मात्र, अगदी प्राचीन काळातील होमो इरेक्टसचे (पाठीचा कणा ताठ ठेवून चालणारे) अवशेष 1891 मध्ये, होमो हिडेलबर्गेन्सिसचे 1907 मध्ये आणि होमो हॅबिलिसचे (हाताचा कुशलतेने वापर करू शकणारे) 1960 मध्ये अवशेष मिळाल्यावर या दोन्ही प्रजाती खर्‍याच वेगळ्या आहेत का याची चर्चा सुरू झाली. 2010 मध्ये संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय टीमने जीनोमचा अभ्यास करून याबाबतचे काही निष्कर्ष काढले. त्यानुसार मानवी जीनोममध्ये निएंडरथलचाही छाप उमटलेला आहे. याचा अर्थ किमान 1,20,000 वर्षांपूर्वी या दोन्ही प्रजाती एकमेकांमध्ये मिसळल्या होत्या. त्यामुळे अनेक संशोधकांना वाटते या एकाच प्रजातीच्या दोन उपशाखांमधील लोक होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news