Wegovy Side Effects : वजन कमी करण्याच्या ‌‘विगोव्ही‌’ औषधामुळे ‌‘आय स्ट्रोक‌’चा धोका?

जगभरात लोकप्रिय असलेल्या गोळीबाबत तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
Wegovy Side Effects
Wegovy Side Effects
Published on
Updated on

लंडन : सध्या वजन कमी करण्यासाठी जगभरात अत्यंत लोकप्रिय झालेले ‌‘विगोव्ही‌’ हे औषध आता गोळीच्या स्वरूपातही उपलब्ध झाले आहे. मात्र, अलीकडेच समोर आलेल्या एका संशोधनाने या औषधाबाबत चिंतेचे ढग निर्माण केले आहेत. या औषधामुळे ‌‘आय स्ट्रोक‌’ किंवा वैद्यकीय भाषेत ज्याला ‌‘इश्यूमिक ऑप्टिक न्यूरोपॅथी‌’ (ION) म्हणतात, त्याचा धोका उद्भवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे दृष्टी वेगाने जाण्याची भीती असते.

तथापि, तज्ज्ञांनी विगोव्ही वापरणाऱ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, औषध आणि आय स्ट्रोक यांच्यातील संबंध अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेला नाही. ‌‘बिटिश जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी‌’ (BJO) मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, विगोव्ही घेणाऱ्या आणि दुष्परिणामांची नोंद करणाऱ्या रुग्णांपैकी १ टक्क्यापेक्षाही कमी लोकांमध्ये ION ची लक्षणे दिसून आली आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अमांडा ॲडलर यांनी सांगितले की, ‌‘ ION ही समस्या अत्यंत दुर्मीळ असल्याने, त्याचे धोके हे या औषधाच्या (सेमाग्लुटाइड) फायद्यांपेक्षा मोठे नाहीत.‌’ ‘आय स्ट्रोक‌’ किंवा ION ही स्थिती डोळ्यांच्या मज्जातंतूंना होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे निर्माण होते. यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊन दृष्टी अचानक कमी होऊ शकते.

२०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वैद्यकीय पुनरावलोकनातही असे दिसून आले होते की, मधुमेहाच्या उपचारांसाठी सेमाग्लुटाइड वापरणाऱ्या रुग्णांमध्ये आय स्ट्रोकचा धोका इतरांच्या तुलनेत किंचित जास्त होता. मात्र, केवळ वजन कमी करण्यासाठी हे औषध वापरणाऱ्यांमध्ये असा कोणताही मोठा धोका आढळलेला नाही. ब्रिटिश आरोग्य नियामक संस्थेने (MHRA) सेमाग्लुटाइड वापरणाऱ्या रुग्णांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ‌‘जर तुम्हाला तुमची दृष्टी वेगाने कमी होत असल्याचे किंवा धूसर होत असल्याचे जाणवले, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या,‌’ असा सल्ला डॉ. ॲडलर यांनी दिला आहे. जरी संशोधनाने एक संभाव्य धोका दर्शवला असला, तरी त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तरीही, कोणत्याही वजन कमी करण्याच्या औषधाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news