

तेल अवीव : अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेल्या सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार, विश्वात प्रकाशापेक्षा वेगाने काहीही प्रवास करू शकत नाही. मात्र, शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच अशा ‘रिकाम्या पोकळ्या’ (Empty Voids) शोधल्या आहेत, ज्यांनी प्रकाशाच्या वेगाची मर्यादा ओलांडली आहे. विशेष म्हणजे, असे करताना भौतिकशास्त्राच्या नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही.
‘टेक्नियन-इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी हे अजब संशोधन केले आहे. त्यांनी ‘अल्ट्राफास्ट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘बोरोन नायट्राईड’च्या अत्यंत पातळ थरातील ‘फोनॉन-पोलॅरिटॉन’ (Phonon- polariton) लहरींचा अभ्यास केला. या लहरी फोटॉन (प्रकाश) आणि सूक्ष्म कंपन (ध्वनी) यांच्या संयोगातून बनलेल्या असतात. ज्याप्रमाणे तलावाच्या लाटा एकमेकींना छेदतात, तेव्हा काही ठिकाणी त्या एकमेकींचा प्रभाव नष्ट करतात. अशा बिंदूंवर लाटांची तीव्रता शून्यावर येते आणि तिथे एक तात्पुरता भोवरा किंवा पोकळी निर्माण होते. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘सिंग्युलॅरिटी’ असे म्हणतात.
1970 च्या दशकापासूनच अशा सिंग्युलॅरिटी प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावू शकतात, असा सिद्धांत मांडला जात होता. आता संशोधकांनी ते प्रत्यक्षात सिद्ध केले आहे. आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार, कोणतीही माहिती, पदार्थ किंवा ऊर्जा प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगाने प्रवास करू शकत नाही. मात्र, या ‘सिंग्युलॅरिटी’ म्हणजे निव्वळ ‘शून्यता’ किंवा ‘रिकामी पोकळी’ आहे. ‘या पोकळ्यांमध्ये कोणताही पदार्थ किंवा ऊर्जा नसते. त्या पूर्णपणे रिकाम्या असल्याने त्यांना विश्वातील वेगाची मर्यादा लागू होत नाही,’ असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.