Super pressure balloon | विजयवाडाचे स्टार्टअप लाँच करणार देशातील पहिला ‘सुपर प्रेशर बलून’

Super pressure balloon |
Super pressure balloon | विजयवाडाचे स्टार्टअप लाँच करणार देशातील पहिला ‘सुपर प्रेशर बलून’
Published on
Updated on

विजयवाडा : अंतराळाची उंची आणि विमानांचे उड्डाण यांच्यादरम्यान असलेल्या ‘नियर स्पेस’ या क्षेत्रात आता भारत आपले वर्चस्व निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील ‘रेड बलून एअरोस्पेस’ हे स्टार्टअप येत्या काही महिन्यांत भारताचे पहिले स्वदेशी ‘सुपर प्रेशर बलून’ (SPB) लाँच करणार आहे.

सामान्य हवामान शोधक फुगे ठराविक उंचीवर गेल्यावर फुगतात आणि फुटतात. मात्र, ‘सुपर प्रेशर बलून’ हे आपले आकारमान आणि दाब स्थिर ठेवतात. यामुळे हे फुगे अनेक आठवडे किंवा महिने हवेत तरंगत राहू शकतात. यामध्ये 25 ते 75 सें.मी. रेझोल्युशनचे उच्च क्षमता असलेले कॅमेरे आणि सेन्सर्स असतील. उपग्रहांच्या उलट, या प्लॅटफॉर्म्सना पुन्हा जमिनीवर उतरवून त्यांची दुरुस्ती, अपग्रेडेशन आणि पुनर्प्रक्षेपण करणे शक्य आहे.

पृथ्वीपासून 20 कि.मी. ते 100 कि.मी. (कर्मन रेखा) दरम्यानच्या भागाला ‘नियर स्पेस’ म्हणतात. येथे हवा इतकी विरळ असते की, विमानाचे पंख काम करू शकत नाहीत आणि इतकी दाट असते की, उपग्रह घर्षणामुळे जळून खाक होऊ शकतात. म्हणूनच या क्षेत्रात काम करण्यासाठी ‘फुगे’ हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स आणि अनेक वर्षांचा काळ लागतो. त्या तुलनेत सुपर प्रेशर बलून अत्यंत कमी खर्चात तयार होतात आणि काही आठवड्यांतच तैनात केले जाऊ शकतात.

ज्या दुर्गम गावांत किंवा आदिवासी भागात मोबाईल टॉवर उभारणे अशक्य आहे, तिथे या तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेट आणि मोबाईल सेवा पुरवता येईल. हे फुगे ‘नियर स्पेस’मधून देशावर बारकाईने लक्ष ठेवतील. शेकडो किलोमीटर लांब पाईपलाईन, पॉवर ग्रिड आणि सागरी सीमांचे रिअल टाईम निरीक्षण यामुळे शक्य होईल. पूर किंवा चक्रीवादळाच्या काळात हे फुगे ‘बर्डस्-आय व्ह्यू’ (विहंगम द़ृश्य) प्रदान करतील, ज्यामुळे मदत आणि बचाव कार्यात मोठी मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news