Veronika cow Austria | ऑस्ट्रियामधील ‘वेरोनिका’ गाय करते साधनांचा वापर

Veronika cow Austria
Veronika cow Austria | ऑस्ट्रियामधील ‘वेरोनिका’ गाय करते साधनांचा वापरFile Photo
Published on
Updated on

व्हिएन्ना : प्राण्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल अनेकदा आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात, पण एका गायीने चक्क ‘साधनाचा’ (टूल) वापर केल्याची घटना जगात पहिल्यांदाच नोंदवली गेली आहे. ऑस्ट्रियामधील ‘वेरोनिका’ नावाच्या गायीने केवळ वस्तूचा वापरच केला नाही, तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांना खाजवण्यासाठी त्या वस्तूचा कोणता भाग योग्य आहे, याची निवड करून शास्त्रज्ञांना थक्क केले आहे.

ऑस्ट्रियाच्या आल्प्स पर्वतरांगांमध्ये राहणारे सेंद्रिय शेतकरी विटगर विगेल यांनी त्यांच्या ‘वेरोनिका’ नावाच्या गायीला अनेकदा तोंडात काठी धरून स्वतःला खाजवताना पाहिले होते. गेल्या 9 वर्षांपासून ती कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय हे करत होती. विगेल यांनी याचे व्हिडीओ ‘युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी मेडिसिन, व्हिएन्ना’ येथील संज्ञानात्मक जीवशास्त्रज्ञ (Cognitive Biologist) अ‍ॅलिस और्सपर्ग यांना पाठवले. डॉ. अ‍ॅलिस यांच्या मते, ‘लोक अनेकदा प्राण्यांच्या कोणत्याही हालचालीला साधनांचा वापर समजतात, पण हा व्हिडीओ वेगळा होता. यात ती गाय त्या वस्तूचा वापर आपल्या शरीराचाच एक भाग असल्यासारखा करत होती.’

या दाव्याची शहानिशा करण्यासाठी शास्त्रज्ञ अँटोनियो ओसुना-मस्कारो आणि त्यांच्या चमूने वेरोनिकाची चाचणी घेतली. त्यांनी तिच्यासमोर जमिनीवर एक मोठा ब्रश ठेवला. या प्रयोगामागचा उद्देश स्पष्ट करताना ओसुना-मस्कारो म्हणाले, ‘झाडूला एक कार्यात्मक बाजू (ब्रशचा भाग) आणि एक साधी बाजू (दांडा) असते. जर वेरोनिकाला साधनाची समज असेल, तर ती खाजवण्यासाठी ब्रशच्या भागालाच प्राधान्य देईल, असे आमचे भाकीत होते.’ वेरोनिकाने झाडूचा दांडा तोंडात धरून ब्रशच्या बाजूने स्वतःला खाजवले.

तिने उलट्या पद्धतीने (दांड्याने) खाजवण्यापेक्षा ब्रशने खाजवण्याला 2.5 पट जास्त पसंती दिली. तिने हे सर्व कोणत्याही मानवी मदतीशिवाय किंवा प्रशिक्षणाशिवाय केले. शास्त्रज्ञांच्या मते, ती गाय त्या साधनाची तांत्रिक बाजू समजून घेऊन त्याचा वापर आपल्या शरीराची लांबी वाढवण्यासाठी करत होती. काही काळानंतर या वर्तनात अधिक सूक्ष्म आणि प्रगत पद्धती दिसून आल्या, ज्यावर शास्त्रज्ञ सध्या अधिक अभ्यास करत आहेत. गाईंसारख्या पाळीव प्राण्यांमध्ये इतकी प्रगत बुद्धिमत्ता असणे हे जीवशास्त्राच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news