

युक्रेनच्या राष्ट्रीय पोशाखाचे नाव 'वैश्यवांका' असे आहे. या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेले युक्रेनियन भरतकाम. हे भरतकाम आपण इतरत्र पाहतो त्यापेक्षा वेगळे असते. वैश्यवांका हा तागाचा बनलेला एक साधा, पांढरा शर्ट असतो आणि त्यावर फुलांची रंगीबेरंगी सजावट केलेली असते. ही सजावट खास हाताने विणून बनवलेली असते. या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्त्री आणि पुरुष असे दोघेही परिधान करतात.
युक्रेन हा शेतीच्या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. त्याला युरोपचे 'ब—ेडबास्केट' असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे हा देश युरोपातील सर्वात मोठ्या गहू उत्पादक देशांपैकी एक आहे. 1991 मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाले आणि युक्रेन वेगळा झाला. त्यानंतरही देशाने कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली. या देशातील 30 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. शेती हाच त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. युक्रेनमधील काळ्या, सुपीक जमिनीमुळे इथे गहू आणि अन्य काही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
युक्रेनची राजधानी कीव्ह अतिशय मोठ्या आकाराचे शहर आहे. तेथील स्वितोशिंको ब—ोवार्स्का ट्रेन लाईन ही जगातील सर्वात खोल भुयारी मार्ग आहे. ही ट्रेन जमिनीखाली 105.5 मीटर खोलीवरून धावते. तिची बहुतांश स्थानके त्याच स्तरावर बांधलेली आहेत. हे भुयारी रेल्वेस्थानक 1960 मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघाने बनवलेले आहे. हे कीव्ह मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आले होते.
युक्रेन हा देश विमाने बनवण्यासाठीही प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठे विमानही याच देशात बनते हे विशेष. 'एन-225' हे आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान आहे. त्याचे वजन तब्बल 710 टन आहे. त्याचा 5,59,580 पौंड इतका एअरलिफ्टेड पेलोड हा एक विक्रमच आहे. हे विमान युक्रेनमध्ये बांधले गेले त्यावेळी हा देश रशियन सोव्हिएत संघाचा एक भाग होता.
सूर्यफूल बियाण्यांचाही युक्रेन सर्वात मोठ्या उत्पादक देशांपैकी एक आहे. याबाबत रशियाचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर युक्रेनचा क्रमांक आहे. अमेरिकेचा क्रमांक दहावा आहे. युक्रेनच्या सूर्यफूल शेतीचा एकूण आकार हा स्लोव्हेनियाइतका भाग व्यापणारा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच सूर्यफूल हेच युक्रेनचे राष्ट्रीय फूलही आहे.
युक्रेनमध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेली सात ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यामध्ये कीव्हचे सेंट सोफिया कॅथेड्रल आणि ल्विव्हचे ऐतिहासिक केंद्र, कार्पेथियन्समधील लाकडी चर्च आणि त्याच्या सभोवतालचे घनदाट जंगल यांचा समावेश आहे. या ठिकाणांना दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात.
युक्रेनच्या क्लावेन येथील 'द टनेल ऑफ लव्ह' हा एक नैसर्गिक रेल्वे बोगदा आहे. हा सुंदर मार्ग दोन्ही बाजूला वेली आणि झाडांच्या हिरव्यागार कमानींनी बनलेला आहे. हे पृथ्वीवरील सर्वात रोमँटिक ठिकाण मानले जाते. त्यामुळे अनेक जोडपी याठिकाणी येत असतात.
सन 1853 मध्ये युक्रेनच्या जान झेह आणि इग्नासी युकासिवझ यांनी गॅस दिव्याचा शोध लावला. हे दोघे स्थानिक फार्मासिस्ट होते. हा शोध त्यांनी 'अॅट द गोल्डन स्टार' नावाच्या स्टोअरमध्ये लावला. आजही ही आठवण त्या इमारतीमध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. याच इमारतीत गासोवा लअम्पा नावाचे कॅफे आहे.