Pink Palace : खऱ्या आयुष्यातील बार्बी!

ब्रिटनच्या महिलेने घराला बनवले ‘पिंक पॅलेस’
Pink Palace
ब्रिटनच्या महिलेने घराला बनवले ‘पिंक पॅलेस’
Published on: 
Updated on: 

लंडन : एखाद्या रंगाचे वेड माणसाच्या डोक्यावर किती प्रमाणात स्वार होऊ शकते, याचे एक अनोखे उदाहरण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय सारा विल्किन्सन यांनी आपले संपूर्ण घर, कार आणि घरातील सर्व वस्तू गुलाबी (पिंक) रंगात रंगवून स्वतःचे एक ‘बार्बी हाऊस’ (बार्बी पिंक पॅलेस) तयार केले आहे.

सारा यांनी गेल्या ८ वर्षांत जवळपास २५,००० पाउंड (भारतीय चलनानुसार सुमारे ३२ लाख रुपये) खर्च करून आपल्या ५ खोल्यांच्या घराला एखाद्या बार्बी डॉलच्या महालासारखे रूप दिले आहे. त्यांच्या घरातील भिंती, पायऱ्या, दरवाजे आणि किचन तर गुलाबी आहेच; पण त्याशिवाय त्यांचा लॅपटॉप, फिरण्याची बॅग, बागेतील पाण्याचा पाईप आणि चक्क त्यांची ‘पावर ड्रिल मशीन’ देखील गुलाबी रंगाची आहे.

घरच नव्हे, तर संपूर्ण आयुष्यच ‘पिंक’

सारा यांचे हे वेड केवळ घरापुरते मर्यादित नाही. त्यांचे स्वतःचे केस गुलाबी रंगाचे आहेत, त्यांच्या कपाटात फक्त गुलाबी रंगाचे कपडे आहेत आणि त्यांच्या बीएमडब्‍ल्‍यू कारचे विंग मिरर्स, बॅज आणि नंबर प्लेटस्‌देखील याच रंगात रंगवलेले आहेत. जेव्हा त्या कार घेऊन बाहेर पडतात, तेव्हा लोक त्यांच्याकडे पाहतच राहतात. एकदा तर एका लहान मुलीने त्यांना पाहून ‘‘बघा, ती बार्बी चालली आहे!’’ अशी ओरडून साद दिली होती.

पतीची पूर्ण साथ, पण एक ‘कंडिशन’!

या गुलाबी साम्राज्यात सारा यांचे पती ‘टीम’ हे त्यांना पूर्ण साथ देतात. मात्र, टीम यांच्यासाठी घरात एक ‘मॅन केव’ (ऑफिस रूम) तयार करण्यात आली आहे, जी पूर्णपणे ‘पिंक-फ्री’ (गुलाबी रंगाशिवाय) ठेवण्यात आली आहे, जेणेकरून ते तिथे शांततेत काम करू शकतील.

लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष

काही लोक सारा यांना ‘सनकी’ किंवा ‘पागल’ म्हणतात, तर अनेक जण त्यांच्या या हटके आवडीचे कौतुक करतात. मात्र, सारा या सर्व नकारात्मक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ‘‘आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे इतरांची पर्वा न करता आपल्याला हव्या त्या पद्धतीने जगण्यातच खरा आनंद आहे,’’ असे सारा यांचे म्हणणे आहे. सध्या सारा हे घर विकून शांत ग्रामीण भागात जाण्याच्या तयारीत आहेत, पण तिथे बांधले जाणारे त्यांचे पुढचे घरही संपूर्ण गुलाबी रंगाचेच असेल, असा निश्चय त्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news