

सेऊल : दक्षिण कोरियातील बंगये-री या ठिकाणी जिन्गको नावाचे अतिशय अनोखे झाड आहे. हे झाड किमान 800 वर्षांपूर्वीचे असेल, असे तेथे मानले जाते. अतिशय डौलदार व निसर्गसौंदर्याची उधळण करत असलेला हा वृक्ष सध्या बराच बहरला असून, त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अगदी दूर-दूरवरून पर्यटक येत असतात. या वृक्षाचा तितकाच शानदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला हजारो व्ह्यूज मिळाले. काही युजर्सच्या मते, हा जगातील सर्वात सुंदर व सर्वात डौलदार वृक्ष आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या झाडाला 31 जानेवारी 1965 पासून नॅचरल मॉन्युमेंटचा दर्जा देण्यात आला आहे. यानुसार, त्याचे जतन, संवर्धन केले जाते. या झाडाची उंची 33 मीटर म्हणजे 108 फूट इतके आहे.
व्हिजीट कोरियाच्या अहवालानुसार, हे झाड सियोंग्जू ली कुटुंबीयातील एका सदस्याने लावले होते. बांगये-री गावातील प्रमुख चाई बेओम-सिकने रोज सरासरी 4 हजार लोक भेट देत असल्याचे सांगितले. आठवड्यातील सुट्टीचे दिवस असो किंवा सर्वसाधारण दिवस असेल, येथील गर्दी कधीही कमी होत नाही, असे चाईने येथे पुढे नमूद केले.