Fish Head Bulb | ‘या’ माशाच्या डोक्यावर असतो चक्क ‘बल्ब’!

Fish Head Bulb |
Fish Head Bulb | ‘या’ माशाच्या डोक्यावर असतो चक्क ‘बल्ब’!
Published on: 
Updated on: 

लंडन : महासागराचा पृष्ठभाग जितका सुंदर आणि प्रकाशमय दिसतो, तितकाच त्याचा हजारो मीटर खोल असलेला भाग अत्यंत अंधकारमय, गूढ आणि थक्क करणारा असतो. सूर्यप्रकाश कधीही न पोहोचणाऱ्या या अथांग खोलीवर राहणारा एक अत्यंत अनोखा आणि भयानक जीव म्हणजे 'अँगलर फिश'. हा मासा त्याच्या विचित्र रूपामुळे आणि डोक्यावर असणाऱ्या नैसर्गिक 'बल्ब'मुळे संपूर्ण जगात ओळखला जातो.

अँगलिंग (मासेमारी) या शब्दावरून या माशाला 'अँगलर फिश' हे नाव मिळाले आहे. या माशाच्या मादीच्या डोक्यावर एक लांब काठीसारखा भाग असतो, ज्याच्या टोकाला एक छोटा 'बल्ब' असतो. हा दिवा निसर्गातील 'बायोल्युमिनेसेन्स' (रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वतः प्रकाश निर्माण करण्याची क्षमता) या प्रक्रियेमुळे चमकतो. हजारो फूट खाली असणाऱ्या संपूर्ण काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा हा दिवा चमकतो, तेव्हा इतर लहान मासे आणि जलचर आकर्षित होतात. त्यांना असे वाटते की तिथे एखादा छोटा जीव किंवा अन्‍नाचा तुकडा आहे. जसे मासे या दिव्याच्या जवळ येतात, तसा अँगलर फिश क्षणात आपले भयंकर सुईसारखे दात असलेले तोंड उघडून त्यांना गिळंकृत करतो.

या माशाचे तोंड आणि दात इतके तीक्ष्ण व मागे वळलेले असतात की, एकदा सावज त्याच्या तोंडात गेले की ते पळून जाऊ शकत नाही. खोल समुद्रात जोडीदार शोधणे अत्यंत कठीण असते. काही प्रजातींच्या बाबतीत, नर हा आकाराने अत्यंत लहान असतो आणि तो मादीला चिकटून राहतो. कालांतराने तो पूर्णपणे मादीच्या शरीराचाच एक भाग बनून जगतो. समुद्राच्या तळाशी असणाऱ्या पाण्याच्या प्रचंड दाबाखाली जगण्यासाठी या माशाचे शरीर अत्यंत मऊ आणि लवचिक बनलेले असते. सूर्याच्या किरणांनाही ज्या अंधाराचा स्पर्श झालेला नाही, अशा खोल समुद्रात निसर्गाने या जीवाला दिलेला हा 'दिवा' जगण्याची आणि अन्नाचा शोध घेण्याची एक अद्‍भूत किमया मानली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.