इजिप्तमध्ये उत्खननात सोन्याच्या तेरा जिभा, नखांचा लागला शोध

Egypt Excavation | इजिप्शियन-स्पॅनिश पुरातत्त्व संशोधकांच्या पथकाचे संशोधन
Egypt Excavation |
इजिप्तच्या मिन्या प्रांतातील अल-बहनसा या पुरातत्त्व स्थळी टॉलेमी काळातील एका सामूहिक दफनभूमीचा शोध लावण्यात आला आहे.File Photo
Published on
Updated on

कैरो : इजिप्तच्या मिन्या प्रांतातील अल-बहनसा या पुरातत्त्व स्थळी टॉलेमी काळातील एका सामूहिक दफनभूमीचा शोध लावण्यात आला आहे. बार्सिलोना विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूट ऑफ एशियंट नियर ईस्टर्न स्टडीजच्या नेतृत्वाखाली इजिप्शियन-स्पॅनिश पुरातत्त्व संशोधकांच्या पथकाने याबाबतचे संशोधन केले. यावेळी अनेक कबरी, अनोख्या ममी आणि दफनावेळी ठेवण्यात आलेल्या अनेक वस्तू सापडल्या. या वस्तूंमध्ये सोन्याच्या तेरा जिभा आणि सोन्याच्या नखांचाही समावेश आहे.

सुप्रीम कौन्सिल ऑफ अँटिक्विटीजचे मोहम्मद इस्माइल खालिद यांनी हा शोध या क्षेत्राच्या इतिहासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. इजिप्तमध्ये यापूर्वीही सोन्याच्या जिभा सापडलेल्या आहेत; मात्र याठिकाणी सोन्याच्या जिभा व नखे प्रथमच आढळली आहेत. येथील ममींबरोबर तब्बल तेरा सोन्याच्या जिभा आढळून आल्या. विशेष म्हणजे सोन्याची नखेही या ममींसोबत होती. मरणोत्तर जीवनासाठी तत्कालीन लोक आपल्या मान्यतेनुसार काय काय करीत असत, हे यावरून दिसून येते. विशेषतः, अलेक्झांडरनंतरच्या काळात इजिप्तचा राजा बनलेल्या टॉलेमीच्या कार्यकाळातील रीतीरिवाज व धार्मिक आस्थांची माहिती यामधून मिळते.

रंगीत शिलालेख आणि धार्मिक द़ृश्ये चितारलेल्या अनेक कबरी याठिकाणी सापडल्या आहेत. एका कबरीचे प्रवेशद्वार आयताकृती दगडाच्या दफनासाठीच्या शाफ्टने सुरू होते. या कबरीत एक मध्यवर्ती दालन व तीन कक्ष आहेत. स्पॅनिश पथकाच्या प्रमुख एस्थर पोंस मेलाडो यांनी सांगितले की, या कक्षांमध्ये अनेक ममी काळजीपूर्वक ठेवण्यात आल्या आहेत. सामूहिक दफनविधीच्या प्रथेचा संकेत देणारे हे ठिकाण आहे. या कबरीतील भिंतींवर अनेक चित्रे रंगवलेली आहेत. त्यामध्ये वेन नेफर आणि त्यांचा परिवार अनुबिस, ओसिरिस, अतुम, होरस आणि थॉथ यांच्यासारख्या देवतांना भेटवस्तू अर्पण करीत असताना दिसतो. छतावर देवी नट हिला तार्‍यांसमवेत दाखवले आहे. या चित्रांमध्ये नावेत खेपरी आणि रा यासारख्या देवता विराजमान असलेल्याही दर्शवले आहे. या कक्षातील एक ममी सोन्याच्या नाजूक पत्र्याने आच्छादलेली होती. हे दैवी सुरक्षेचे एक प्रतीक आहे. कबरीत चुनखडीच्या दगडांपासून बनवलेल्या चार शवपेट्याही आहेत. याठिकाणी 29 ताविजही सापडले आहेत.

Egypt Excavation |
Egypt : प्राचीन ‘ममी पेंटिंग’चा इजिप्तमध्ये शोध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news