‘हे’ पेंग्विन दिवसातून 10 हजारवेळा काढतात डुलक्या!

‘हे’ पेंग्विन दिवसातून 10 हजारवेळा काढतात डुलक्या!

कॅनबेरा : महाभारतात अर्जुनाला 'गुडाकेश' असे संबोधलेले आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ 'झोपेवर विजय मिळवलेला'. तो अनेक दिवस झोपेशिवाय राहू शकत होता इतकाच त्याचा अर्थ नाही. ऐन युद्धाच्या काळात, रणांगणात रथ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असताना, उभ्या उभ्याच तो काही मिनिटांची हुकमी झोप घेऊन स्वतःला ताजातवाना ठेवू शकत असे. त्याच्यामध्ये हवे त्यावेळी झोप घेऊन हव्या त्यावेळी जागे होण्याचे असे विलक्षण सामर्थ्य होते.

आता हे आठवण्याचे कारण म्हणजे अशीच कृती पेंग्विनची एक प्रजातीही करते असे दिसून आले आहे. पशू-पक्ष्यांची न्यारी दुनिया नेहमीच माणसाला थक्क करीत असते. आता चिनस्ट्रॅप पेंग्विनवर असेच नवे संशोधन झाले आहे. या प्रजातीमधील पेंग्विन जगातील सर्वाधिक वेळा डुलक्या काढणारे जीव ठरले आहेत. ते रोज दहा हजारांपेक्षा अधिक वेळा डुलक्या घेतात; पण त्यांची एक डुलकी अवघ्या चार सेकंदांचीच असते!

या पेंग्विन पक्ष्यांच्याही ब्रीडिंग कॉलनीज असतात. प्रजननासाठी एकत्र आलेले असे हजारो पेंग्विन समूहात राहतात. त्यांना आपल्या घरट्यांवर सातत्याने लक्ष द्यावे लागते. या घरट्यांना वसाहतीच्या शेजार्‍यांकडून आणि स्कुआ पक्ष्यांकडून धोका असतो. त्यामुळे या पक्ष्यांना सलगपणे झोप घेता येत नाही. त्यांचे झोपेचे वेळापत्रक अस्ताव्यस्त बनलेले असते. त्यामुळे दिवसाच्या वेळात ते चार-चार सेकंदांच्या डुलक्या काढून स्वतःला ताजेतवाने ठेवत असतात.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायन्स' या नियतकालिकात देण्यात आली आहे. फ्रान्सच्या लियॉन सेंटर फॉर रिसर्च इन न्यूरोसायन्स या संस्थेतील संशोधक पॉल-अँटोनी लिबरेल यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत झोपेचाही कसा खुबीने समावेश होत असतो याचे हे उदाहरण आहे. हे पक्षी आपल्या अंडी व घरट्याचे रक्षण करीत असतानाच अधूनमधून डुलक्या काढून स्वतःला 'फ्रेश' ठेवतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news