रोज डायरी लिहिण्याचे ‘हे’ आहेत लाभ…

रोज डायरी लिहिण्याचे ‘हे’ आहेत लाभ…

'डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक' सारख्या रोजनिशी जगभरात प्रसिद्ध आहेत. अनेक नामवंत लोकांनीही रोजनिशी लिहिली होती व त्यांची ही डायरी नंतर ऐतिहासिक दस्तावेज बनून राहिली. लिहिण्याच्या सवयीमुळे शब्द रचना, लेखनकौशल्य तर वाढतेच; पण त्यासोबतच लिहिण्याची सवय तुम्हाला मानसिक नैराश्यापासून दूर राहण्यास मदत करते, असे तज्ज्ञ सांगतात. रोज डायरी लिहिण्याचे 'हे' आहेत काही लाभ…

तणाव घटतो : रोजनिशी लिहिल्याने तुमच्या मनावरील तणाव कमी होतो, असं तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक छोट्या-मोठ्या समस्यांना प्रत्येक जण सामोरा जात असतो. माणूस हा समाजप्रिय प्राणी असून, तो एकटा राहू शकत नाही. या स्पर्धेच्या युगात अनेक जण मानसिकद़ृष्ट्या एकटे पडतात. मनात असलेला राग, दु:ख, आनंद आणि तणाव व्यक्त करण्याकरिता, बोलण्याकरिता प्रत्येक वेळी माणसं जवळ नसतात. त्यामुळे नैराश्यात जाण्याचा धोका अधिक असतो. मात्र, जर तुम्हाला डायरी लिहिण्याची सवय असेल, तर ही सवय तुमच्या यशस्वी आयुष्याची गुरूकिल्ली ठरते. मनाविरुद्ध घडणार्‍या घटनांचा माणूस अतिविचार करतो. त्यामुळे वाईट घटनांचा मनावर आणि शरीरावरही गंभीर परिणाम होतो. म्हणूनच डायरी लिहिण्यास सुरुवात केली, तर अतिविचार न करता माणसाचा स्वत:शी संवाद घडू लागतो.

सर्जनशीलता : क्रिएटिव्हीटी म्हणजेच सर्जनशीलता किंवा नवे काही करण्याची क्षमता डायरी लिहिण्याच्या सवयीने विकसित होते. एखादा प्रसंग, एखाद्या ठिकाणाला दिलेली भेट, ते ते क्षण काही जण फोटोत कैद करतात, तर काही जण आपल्या डायरीत नोंद करून ठेवतात. डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे तुमची क्रिएटिव्हीटी वाढण्यास मदत होते. मोठ मोठे व्यावसायिक हे त्यांच्या करिअरमधील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ते डायरीमध्ये आपले टार्गेटस् लिहून ठेवतात. यशस्वी करिअर करण्याकरिता सातत्य आणि शिस्त फार महत्त्वाची असते. लिहिण्याच्या सवयीमुळे आयुष्यात काय करावं आणि काय करू नये, याचे निर्णय घेण्यासाठी मदत होते.

स्मरणशक्ती वाढते : मानवी मेंदूमध्ये एकावेळी अनेक विचार सुरू असतात, त्यामुळे याचा परिणाम स्मरणशक्तीवर ही होतो. जर तुम्ही रोज डायरी लिहित असाल, तर तुमची स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते. डायरीमध्ये तारीख आणि वर्ष नमूद असल्याने ठरावीक लिखाण कधी लिहिलं, याची माहिती राहते. त्यामुळे रोज डायरी लिहिण्याची सवय तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news