जपानमध्ये आहे घटस्फोटाचे मंदिर!

जपानमध्ये आहे घटस्फोटाचे मंदिर!
Published on
Updated on

टोकियो : जगात अशा भरपूर जागा आहेत, ज्या आपल्या अनोख्या कथांमुळे आणि इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. भारतात अशा बर्‍याच जागा पाहायला मिळतील. मात्र, जगातही अशा अनेक जागा आहेत, ज्या सगळ्यांनाच चकित करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. जपानमधील हे मंदिर 'डिव्होर्स टेम्पल' म्हणजेच 'घटस्फोटाचं मंदिर' म्हणून ओळखलं जातं. जपानमध्ये असलेल्या या मंदिराचं नाव मात्सुगाओका टोकेई-जी आहे. खरंतर, 12व्या आणि 13व्या शतकात जपानी समाजात घटस्फोटाच्या तरतुदी फक्त पुरुषांसाठीच होत्या. त्या काळात पुरुष आपल्या बायकोला अगदी सहज घटस्फोट देऊ शकत होते. पण, कौटुंबिक हिंसाचार किंवा अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी या मंदिराचे दरवाजे उघडले गेले.

डिव्होर्स टेम्पल नक्कीच थोडं विचित्र वाटतं; पण त्यामागेही एक कथा आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, टोकई-जीचा इतिहास सुमारे 600 वर्ष जुना आहे. हे मंदिर जपानच्या कामाकुरा शहरात आहे. हे मंदिर घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांचे घर मानले जाते. असं म्हणतात, की शतकानुशतके स्त्रिया आपल्यावर अत्याचार करणार्‍या पतीपासून मुक्त होण्यासाठी या मंदिराचा आश्रय घेत असत. हे मंदिर काकुसान-नी नावाच्या ननने तिचा पती होजो टोकिमून यांच्या स्मरणार्थ बांधलं होतं.

ती आपल्या पतीसोबत खूश नव्हती आणि तिच्याकडे घटस्फोट घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जपानमधील कामकुरा युगात महिलांचे पती कोणतंही कारण न देता लग्न मोडू शकत होते. त्यासाठी त्यांना साडेतीन ओळींची नोटीस लिहावी लागायची; तर काही लोकांच्या मते सुमारे तीन वर्षे या मंदिरात राहिल्यानंतर महिला आपल्या पतीशी संबंध तोडू शकत होत्या. नंतर ते दोन वर्षांपर्यंत कमी करण्यात आलं. सन 1902 पर्यंत मंदिरात पुरुषांना सक्त मनाई होती. पण, त्यानंतर 1902 मध्ये जेव्हा एन्गाकू-जी यांनी या मंदिराची जबाबदारी घेतली, तेव्हा त्यांनी एक पुरुष मठाधिपती नेमला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news