‘त्या’ धूमकेतूवर वारंवार होत आहेत स्फोट

‘त्या’ धूमकेतूवर वारंवार होत आहेत स्फोट

लंडन : पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या एका बर्फाळ धूमकेतूवर वारंवार स्फोट होत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच त्याच्यावरील चौथ्या स्फोटाची नोंद करण्यात आली आहे. माऊंट एव्हरेस्टपेक्षा तिप्पट मोठा असलेल्या या क्रायोव्होल्कॅनिक धूमकेतूवरील हा नवा स्फोट आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट ठरू शकतो. त्यावेळी हा धुमकेतू अचानक शंभर पट अधिक प्रकाशमान झाला आणि पृथ्वीपासून सुमारे 600 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावरील अंडाकार आकाशगंगेइतकी त्याची चमक झाली. दोन आठवड्यांपूर्वीच या धूमकेतूवर एक स्फोट झाला होता.

या धूमकेतूकडे इलियट हर्मन हे खगोलशास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. त्यांचे म्हणणे आहे की '12 पी' नावाचा हा धूमकेतू वारंवार स्फोटांचा अनुभव देत आहे. जुलैमध्ये त्याच्यावरील पहिल्या स्फोटाची नोंद झाली होती. आता चार महिन्यांमध्येच हा चौथा स्फोट झाला आहे. पुढील वर्षी जूनमध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळून जाईल. अर्थात त्याच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. दुर्बिणीतून पाहिल्यावर हा धुमकेतू शिंगांच्या एका विशाल सेटसारखा दिसतो. त्यामुळे त्याला 'शिंगांचा धुमकेतू' असे म्हटले जात आहे. काही वैज्ञानिकांनी त्याची तुलना स्टार वॉर्समधील 'मिलेनियम फाल्कन' अंतराळयानाशीही केली आहे. वैज्ञानिकांनी त्याला '12पी/पोंस-ब्रुक्स' असे नाव दिले आहे. या धुमकेतूवर थंड ज्वालामुखी आहेत. त्यांच्यामधून बर्फ व वायू बाहेर येतात. या धूमकेतूचा व्यास 30 किलोमीटरचा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news