Most Dangerous Spiders | सर्वात खतरनाक कोळी

Most Dangerous Spiders |
Most Dangerous Spiders | सर्वात खतरनाक कोळी
Published on: 
Updated on: 

घरात आढळणारे कोळी अतिशय साधे असतात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात असे अनेक कोळी आहेत, ज्यांच्या दंशाने माणसाचा जीवदेखील जाऊ शकतो. या कोळ्यांनी हल्ला केल्यास आणि वेळवर उपचार न मिळाल्यास तो मृत्यूचे कारण ठरू शकतो. जरी बहुतेक कोळी माणसांपासून दूरच राहतात, तरीही या विषारी प्रजातींचा सामना घरांमध्ये, जंगलात आणि अगदी शहरी भागातही होऊ शकतो. जाणून घेऊयात जगातील सर्वात धोकादायक कोळ्यांबद्दल...

ब्राऊन रिक्लेझ स्पायडर

ब्राऊन रिक्लेझ स्पायडरला ‘लोक्सोसेल्स रिक्लेसा’ या नावानेही ओळखले जाते. हे आपल्या विषारी दंशासाठी उत्तर अमेरिकेतील सर्वात धोकादायक कोळ्यांपैकी एक आहे. त्यांच्या पाठीवर व्हायोलिन आकाराच्या खुणेवरून त्यांना सहज ओळखता येते. हा कोळी लाजाळू प्रवृत्तीचा असतो आणि सामान्यतः अंधाऱ्या व शांत जागांवर जसे की कपाट किंवा लाकडाच्या ढिगाऱ्यात लपून राहतो. या कोळ्याच्या दंशाने त्वचेवर गंभीर नेक्रोसिस (पेशी किंवा ऊती नष्ट होणे) होऊ शकते, ज्यामुळे वेदनादायक अल्सर आणि ऊतींचे नुकसान होते, ज्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. हा कोळी दुर्मीळच प्राणघातक ठरतो. परंतु, काही प्रकरणांमध्ये याचे विष संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकते.

ब्राझिलियन वंडरिंग स्पायडर

ब्राझिलियन वंडरिंग स्पायडर (ज्यामध्ये Phoneutria fera आणि P. nigriventer यांचा समावेश होतो) जगातील सर्वात विषारी आणि आक्रमक कोळ्यांपैकी एक आहेत. हे दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतात. जाळे बनवण्याऐवजी फिरून शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना हे नाव मिळाले आहे. यांच्या विषामध्ये शक्तिशाली ‘न्यूरोटॉक्सिन्स’ असतात, ज्यामुळे तीव्र वेदना, स्नायू पक्षाघात आणि दुर्मीळ; पण वेळवर उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढवू शकतो. हे कोळी केळीच्या बागांमध्ये लपून बसू शकतात.

यलो सॅक स्पायडर

यलो सॅक स्पायडर (शास्त्रीय नाव : Cheiracanthium inclusum) हा एक विषारी कोळी आहे, जो प्रामुख्याने उत्तर आणि मध्य अमेरिकेत आढळतो. त्याच्या हलक्या पिवळ्या किंवा हलक्या हिरव्या रंगावरून त्याला सहज ओळखले जाऊ शकते. हे कोळी सहसा घरांच्या आत राहणे पसंद करतात आणि कोपऱ्यांमध्ये, पडद्यांवर किंवा छतावर लपून राहतात. यांच्या दंशाने हलक्या वेदना होऊ शकतात. तसेच, त्वचेवर लालसरपणा आणि सूज येऊ शकते. कधीकधी यामुळे त्वचेत जळजळ किंवा छोटे घावदेखील होऊ शकतात. मात्र, हे कोळी माणसांसाठी फारसे खतरनाक नसतात.

वुल्फ स्पायडर

वुल्फ स्पायडर हे ‘लायकोसिडे’ (Lycosidae) कुळाशी संबंधित आहेत. हे जाळे बनवण्याऐवजी त्यांच्या वेगवान गतीसाठी आणि शिकार करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. हे जगभरात आढळतात. हे सामान्यतः मोठ्या आकाराचे, केसदार आणि चपळ शिकारी असतात, जे रात्रीच्या वेळी जमिनीवर फिरतात. यांचे विष माणसांसाठी जीवघेणे ठरत नाही. परंतु, यांच्या दंशाने वेदना, सूज आणि खाज सुटू शकते. जेव्हा त्यांना धोका जाणवतो किंवा त्यांना डिवचले जाते, तेव्हाच ते सहसा दंश करतात. त्यांच्या दंशाने कधीकधी हलकी ॲलर्जीदेखील होऊ शकते. जरी ते दिसायला भयानक वाटत असले, तरी ते बागांमध्ये आणि नैसर्गिक अधिवासात कीटकांची संख्या नियंत्रित करून एक उपयुक्त भूमिका बजावतात.

ब्लॅक विडो स्पायडर

ब्लॅक विडो स्पायडरचे शास्त्रीय नाव ‘Latrodectus mactans’ असून, तो त्याच्या घातक विष आणि विशिष्ट रूपामुळे ओळखला जातो. त्याचे शरीर चमकदार काळे असते आणि पोटाच्या भागावर लाल रंगाची ‘अवरग्लास’ (वाळूचे घड्याळ) सारखी खूण असते. हा कोळी संपूर्ण उत्तर अमेरिकेत आढळतो आणि लाकडाचे ढीग, शेड आणि गॅरेज यांसारख्या अंधाऱ्या, निर्जन ठिकाणी राहणे पसंद करतो. याच्या विषामध्ये ‘न्यूरोटॉक्सिन’ असते, ज्यामुळे स्नायूंमध्ये तीव्र वेदना, पेटके आणि कळा येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.