

लंडन : जुळी, तिळी मुलं जन्माला येणे यात आता काहीच नावीण्य राहिलेले नाही. युकेतील एका महिलेने देखील अशाच एका तिळ्याला जन्म दिला आहे. पण, डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. आता ही तिळी चर्चेत येण्याचं कारण देखील तितकेच खास आहे. ते म्हणजे, असे तिळी 200 करोडोत एकच असते आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात याचे अधिक कौतुक होते आहे.
हडर्सफिल्ड, वेस्ट यॉर्क्स येथे राहणार्या लॉझी डेव्हिस या महिलेने एकाच वेळी तीन मुलींना जन्म दिला. 10 नोव्हेंबर 2023 रोजी या बाळांचा जन्मा झाला. आता प्रगत तंत्रामुळे लॉझी एकाच वेळी तीन बाळांना जन्म देणार, याची कल्पना होतीच. पण, ती इतकी खास असतील, याचा विचार कोणीच केला नव्हता.
आठ आठवड्यांनंतर केलेल्या तपासणीनंतर डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. ही तिळी दिसायला समसमान आणि अनुवंशिकद़ृष्ट्याही सारखीच होती. डॉक्टरांच्या मते अशा मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण 200 कोटीत एक, इतके दुर्मीळ असते. अशा दुर्मीळ प्रसंगात त्यांचे चेहरेच नव्हे, तर त्यांचे जीन्सही जुळतात आणि म्हणूनच ते इतके खास असतात. आणखी एक आश्चर्य म्हणजे, गेल्या तीन वर्षांत जगातील अशी तिसरी वेळ आहे.