सर्वात वयस्कर दंतवैद्य!

सर्वात वयस्कर दंतवैद्य!

टोकियो : जपानमधील डॉ. एत्सुरो वतनबे यांची जगातील सर्वात वयस्कर दंतवैद्य म्हणून गिनीज रेकॉर्डस्मध्ये वर्णी लागली आहे. एत्सुरो यांचा 31 ऑक्टोबर 1924 रोजी जन्म झाला असून, यानुसार त्यांचे 99 वर्षे 133 दिवस इतके वय असताना गिनीज रेकॉर्डमध्ये त्यांचा अधिकृत समावेश केला गेला. वयाच्या 15 व्या वर्षीच एत्सुरो यांनी दंतवैद्य होण्याचे निश्चित केले होते आणि ते त्यात यशस्वीदेखील झाले.

1944 मध्ये एत्सुरो चीनमध्ये लष्करी सेवेत दाखल झाले. तेथे त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार केले. युद्ध संपल्यानंतर ते वर्षभरानंतर जपानमध्ये परतले आणि त्यांनी दंतवैद्य म्हणून काम सुरू केले. 1947 मध्ये त्यांनी डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पुढील परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी अन्य सहकार्‍यांसह काम केल्यानंतर स्वतंत्र असे क्लिनिक सुरू केले.

एत्सुरो हे यामानाशी प्रांतातील ओशिनो गावचे रहिवासी. त्या गावात ते एकमेव दंतवैद्य होते. आसपासच्या गावातील सर्व रुग्ण त्यांच्याकडेच यायचे. त्यामुळे क्लिनिकमध्ये बरीच गर्दी असायची. त्याकाळी कोणतीही प्रयोगशाळा नसायची. त्यामुळे, आपल्या रुग्णांसाठी त्यांनाच कृत्रिम दातही तयार करावे लागायचे. त्यांचे क्लिनिक आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस चालायचे.

त्यानंतर 92 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्व ऑपरेशन्स फक्त सकाळच्या सत्रात करण्याचा निर्णय घेतला. 5 कन्या, 4 नातवंडे आणि तितकेच भाची-भाचे असलेल्या एत्सुरो यांना आपल्या बागेत वेळ व्यतीत करणे विशेष आवडते. आता ते पूर्वीइतके सातत्याने काम करत नाहीत. मात्र, तरीही रोज थोडा वेळ तरी ते आपल्या प्रॅक्टिससाठी वेळ देत असतात आणि हेच योगदान लक्षात घेत त्यांचे सर्वात वयस्कर दंतवैद्य म्हणून गिनीज रेकॉर्डस्ने दखल घेतली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news