

दुबई : सौंदर्य, फॅशन आणि प्रतिष्ठेच्या जगात एकापेक्षा एक आलिशान वस्तू पाहायला मिळतात. मात्र, केवळ पायात घालण्याच्या चपला किंवा बूट (पादत्राणे) यांची किंमत हजारो किंवा लाखांमध्ये नव्हे, तर शेकडो कोटी रुपयांमध्ये असू शकते, यावर कोणाचाही सहसा विश्वास बसणार नाही. इटालियन डिझायनर ‘अँटोनिओ व्हिएत्री’ यांनी तयार केलेले ‘द मून स्टार शूज’ हे जगातील सर्वात महागडे पादत्राण मानले जाते. या एकाच जोडीची किंमत तब्बल १९.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे १६५ कोटी रुपये) इतकी आहे.
दुबई डिझाईन वीक दरम्यान या अत्यंत दुर्मीळ आणि महागड्या सँडल्सचे अनावरण करण्यात आले होते. ‘अँटोनिओ व्हिएत्री’ हे आधीपासूनच २४ कॅरेट सोन्याचे बूट बनवण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांनी तयार केलेल्या या ‘मून स्टार शूज’ने जगातील सर्वात महागड्या पादत्राणाचा विक्रम नोंदवला आहे. या सँडल्सची हील्स पूर्णपणे शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. या पादत्राणांवर सुमारे ३० कॅरेटचे चमकणारे दुर्मीळ हिरे जडवण्यात आले आहेत.
या पादत्राणांचे सर्वात मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये १५७६ मध्ये अर्जेंटिना येथे सापडलेल्या एका प्राचीन उल्कापिंडाचा तुकडा वापरण्यात आला आहे. ‘द मून स्टार शूज’पूर्वी यूएईमधील ‘जॅडा दुबई’ आणि ‘पैशन ज्वेलर्स’ यांनी संयुक्तपणे तयार केलेले ‘पॅशन डायमंड शूज’ हे जगातील सर्वात महागडे बूट मानले जात होते. सोन्यापासून बनवलेल्या आणि शेकडो हिऱ्यांनी सजवलेल्या या बुटांच्या मध्यभागी १५ कॅरेटचा अत्यंत दुर्मीळ हिरा बसवण्यात आला असून, यांची किंमत १७ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे १४० कोटी रुपये) इतकी आहे.