

वॉशिंग्टन डीसी : सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सौरमालेच्या सुरुवातीच्या काळात पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या आकाराच्या ‘थिया’ या ग्रहामध्ये झालेल्या भीषण धडकेनंतर अवघ्या पाच तासांच्या आत चंद्र आकारास आला असावा, असा नवा आणि थक्क करणारा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ‘साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ (एसडब्ल्यूआरआय) आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना’ येथील संशोधकांनी संगणकावर अतिशय प्रगत सिमुलेशन्स तयार करून हा अभ्यास केला आहे. हे संशोधन ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशित झाले आहे.
नेमकी काय आहे ही नवी शोध थेअरी?
गेल्या अनेक दशकांपासून खगोलशास्त्रज्ञांची अशी धारणा होती की, थिया ग्रहाच्या टक्करीनंतर पृथ्वीवरून उडालेला तप्त खडक आणि धुळीचे कण अंतराळात वर्षानुवर्षे एकत्र येऊन हळूहळू चंद्र तयार झाला असावा. या जुन्या थेअरीत अर्थात यापूर्वीच्या मॉडेलमध्ये ग्रहांच्या खडकांची ताकद आणि त्यांच्या तापमानाचा फारसा विचार केला गेला नव्हता. जेव्हा संशोधकांनी ग्रहांचे तापमान आणि खडकांची ताकद (मटेरियल स्ट्रेंथ) हे घटक सिमुलेशनमध्ये जोडले, तेव्हा अत्यंत धक्कादायक निष्कर्ष समोर आले.
केवळ ५ तासांत चंद्रनिर्मिती
जर धडकेपूर्वी पृथ्वी आणि थिया या दोन्ही ग्रहांची अंतर्गत रचना आणि तापमान समान पातळीवर असेल, तर धडकेनंतर अवघ्या ५ तासांच्या आत अंतराळात फेकला गेलेला तुकडा अखंड राहून थेट चंद्राच्या रूपात स्थिर झाला असावा, असे हे नवे संशोधन सांगते. या अभ्यासाच्या मुख्य लेखिका डॉ. अडीन डेंटन यांच्या मते, दोन ग्रहांच्या धडकेत त्यांचे तापमान हा सर्वात मोठा निर्णायक घटक ठरतो. तप्त अन् गरम ग्रह असेल तर अशा ग्रहांचे तापमान अत्यंत जास्त असल्याने ते मऊ आणि कमजोर बनतात, त्यामुळे धडकेनंतर थिया पूर्णपणे नष्ट होऊन धुळीच्या कणांची एक चकती तयार होते. तुलनेने थंड अन् टणक ग्रह असतील तर असे ग्रह थंड असल्याने त्यांचे खडक अधिक मजबूत राहतात आणि धडकेनंतर तुकडे विखुरण्याऐवजी जलदगतीने एकत्र येऊन अखंड चंद्र तयार होण्याची शक्यता वाढते.
चंद्राच्या अनेक गुढांची उत्तरे मिळण्यास मदत
या नव्या शोधामुळे खगोलशास्त्रातील अनेक प्राचीन कोड्यांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी आणि चंद्राची रासायनिक रचना (आयसोटॉपिक सिग्नेचर) हुबेहूब एकसारखी का आहे, याचे स्पष्टीकरण या सिमुलेशनद्वारे मिळू शकते. चंद्रावर आढळणारे बाष्पीभवन होणारे घटक आणि त्याची विशिष्ट भ्रमणकक्षा समजण्यास मदत होईल. डॉ. डेंटन यांच्या मते, पृथ्वी आणि मंगळ हे एकाच भागात तयार झाल्याने ते भावांसारखे आहेत; परंतु पृथ्वी आणि चंद्र हे एकाच टक्करीतून जन्माला आल्याने ते जुळ्या भावांसारखे आहेत.