Chess History | बुद्धिबळाला आहे हजारो वर्षांचा रंजक इतिहास!

Chess History |
Chess History | बुद्धिबळाला आहे हजारो वर्षांचा रंजक इतिहास!
Published on
Updated on

नवी दिल्ली : बुद्धिबळ हा असा खेळ आहे, जिथे खेळाडूची बुद्धिमत्ता, रणनीती आणि एकाग्रतेची खरी परीक्षा घेतली जाते. आज जगभरात बुद्धिबळाची मोठी क्रेझ असून, याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि चॅम्पियनशिप अत्यंत आवडीने खेळल्या व पाहिल्या जातात. आज जगभर गाजत असलेल्या या खेळाची सुरुवात आपल्या भारतातूनच झाली होती, हे विशेष! या खेळाला हजारो वर्षांचा इतिहास आहे.

बुद्धिबळाची सुरुवात प्राचीन भारतात ६ व्या शतकात, गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. त्याकाळी या खेळाला ‘चतुरंग’ म्हटले जायचे. चतुरंग म्हणजे ‘सैन्याची चार अंगे’ असणारा खेळ. त्या काळातील गोट्यांची नावे सैन्यातील विविध घटकांवर आधारित होती : हत्ती : ज्याला आज आपण ‘रुक’ (Rook) म्हणतो. घोडा : ज्याला आज ‘नाईट’ (Knight) म्हटले जाते. रथ : जो आज ‘बिशप’ (Bishop/उंट) म्हणून ओळखला जातो. पदाति (पायदळ सैनिक) : ज्याला आज ‘पॉन’ (Pawn/प्यादे) म्हणतात. या खेळात राजा आणि मंत्रीही असायचे.

समोरच्या खेळाडूच्या राजाला आपल्या रणनीतीने घेरून कोंडीत पकडणे, हाच खेळाचा मुख्य उद्देश होता, जो आजही कायम आहे. सातव्या शतकानंतर व्यापारी मार्गांद्वारे हा खेळ पर्शिया (इराण) मध्ये पोहोचला, जिथे त्याला ‘शतरंज’ हे नाव मिळाले. जेव्हा एखादा खेळाडू राजावर थेट हल्ला करायचा, तेव्हा त्याला ‘शह’ म्हटले जायचे. राजा पूर्णपणे घेरला गेला की त्याला ‘शह-मात’ म्हटले जायचे. याच शब्दावरून पुढे इंग्रजीत ‘चेकमेट’ (Checkmate) हा शब्द तयार झाला. पर्शियामधून हा खेळ संपूर्ण मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत पसरला. दहाव्या शतकामध्ये व्यापारासोबत हा खेळ युरोपमध्ये पोहोचला.

१५ व्या शतकाच्या सुमारास युरोपमध्ये बुद्धिबळाच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले : वजीर/मंत्री : याला ‘क्वीन’ (Queen) नाव देण्यात आले आणि तिला बोर्डावरील सर्वात शक्तिशाली गोटी बनवले गेले. बिशप (उंट) : याला तिरपे खेळण्याची मुभा देण्यात आली. प्यादे (Pawn) : खेळ जलद व्हावा यासाठी प्याद्याला त्याच्या पहिल्या चालीत दोन घरे पुढे जाण्याचा नियम बनवण्यात आला. या आधुनिक बदलांमुळे आज आपण खेळत असलेल्या ‘चेस’चा जन्म झाला. १९ व्या शतकात बुद्धिबळाला व्यावसायिक रूप मिळाले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू झाल्या. १८८६ मध्ये विल्हेम स्टेइनिट्ज हे जगातील पहिले चेस चॅम्पियन बनले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news