

लिस्बन : जगभरातील महासागरांमध्ये रहस्ये दडलेली आहेत. समुद्राला आपण ‘रत्नाकर’ म्हणत असतो, याचे कारण समुद्र मोत्यांसारखी अनेक रत्ने बहाल करतो. याच महासागरात 250 जहाजे बुडाली आहेत, ज्यामध्ये अनेक टन सोने आणि चांदी आहे. पुरातत्त्व संशोधक अलेक्झांडर मोंटेइरो यांनी याबाबतचा मोठा दावा केला आहे. मोंटेइरो यांच्या मते, पोर्तुगीज समुद्रात ही 250 जहाजे बुडालेली आहेत. यात प्रचंड खजिना असल्याचे म्हटले जाते.
1589 मध्ये लिस्बनच्या दक्षिणेस एक स्पॅनिश गॅलियन बुडाली, ज्यामध्ये अंदाजे 22 टन सोने आणि चांदी होते. हे जहाज नोसा सेनहोरा दो रोसारिया समुद्रतळात गाडले गेले आहे. मोंटेइरो यांनी मडेइरा, अझोरेस आणि पोर्तुगालच्या इतर भागात जहाजांच्या दुर्घटनेचा एक डेटाबेस संकलित केला आहे. त्यावरून असे दिसून येते की, 16 व्या शतकापासून 8,620 जहाजे बुडाली आहेत, त्यापैकी अनेक जहाजांमध्ये खजिना होता. पोर्तुगालमध्ये हा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सुविधा नाहीत. म्हणूनच या बुडालेल्या जहाजांचा आणि खजिन्यांचा शोध घेणे एक मोठे आव्हान बनले आहे. देशातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सागरी सुरक्षितता लक्षात घेऊन प्रथम जहाजे शोधणे आणि नंतर खजिना योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
15 व्या ते 17 व्या शतकादरम्यान पोर्तुगीज साम्राज्य शिखरावर होते. त्यांनी दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि भारताच्या मोठ्या प्रदेशांवर राज्य केले. कालांतराने पोर्तुगीज साम्रा ज्याचा अंत झाला. जर मोंटेइरोचे दावे खरे ठरले, तर हा शोध पोर्तुगालच्या इतिहासावर प्रकाश टाकेल. सागरी इतिहासातील अनेक रहस्ये उघड होतील. या बुडालेल्या जहाजांमध्ये लपलेला खजिना पोर्तुगालसाठी आर्थिक भरभराट निर्माण करू शकतो. सोने, चांदी आणि इतर संपत्तीचा शोध देशाच्या समृद्धीत मोठा हातभार लावू शकतो. खजिन्याचा शोध घेत असताना, सागरी सुरक्षेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया पोर्तुगालच्या सागरी इतिहासाला पुनरुज्जीवित करू शकते. ही खजिने केवळ सोने आणि चांदीचे नाहीत, तर पोर्तुगालच्या पूर्वीच्या साम्राज्याच्या शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. त्यांना शोधून, पोर्तुगाल आपल्या इतिहासात आणि सागरी वारशात नवीन अध्याय जोडू शकतो.