

नवी दिल्ली : भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ने अॅपल डिव्हाईस वापरकर्त्यांसाठी ‘हाय रिस्क सिक्युरिटी वॉर्निंग’ जारी केली आहे. या वॉर्निंगनुसार, आयफोन, आयपॅड, एमएसीबुक, अॅपल वॉच, या सारख्या डिव्हाईसेसमध्ये काही गंभीर सायबर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स वापरकर्त्यांच्या डिव्हाईसवर नियंत्रण मिळवू शकतात आणि त्यांच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण होऊ शकतो.
‘सीईआरटी-इन’ने आपल्या सल्ल्यामध्ये म्हटले आहे की, हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊन तुमच्या डिव्हाईसमध्ये कोड्स इन्स्टॉल करू शकतात. यामुळे त्यांना तुमच्या डिव्हाईसवरील संवेदनशील डेटा, जसे की मेसेजेस, फोटो, बँक डिटेल्स आणि पासवर्डस्मध्ये प्रवेश मिळू शकतो. थोडक्यात, यामुळे हॅकर्स तुमच्या डिव्हाईसवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. या समस्येचा परिणाम फक्त एका विशिष्ट डिव्हाईसवर नसून, आयओएस, आयपॅडओस, एमएसीओएस, टीव्हीओएस, वॉचओएस या सर्व ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या डिव्हाईसेसना आहे.
सॉफ्टवेअर अपडेट करा : तुमच्या डिव्हाईसवरील ऑपरेटिंग सिस्टीम नेहमी अपडेटेड ठेवा. अॅपलने या त्रुटी दूर करण्यासाठी आयओएस 18.1, आयपॅडओए 18.1, एमएसीओएस सोनेमा 4.1 सारखे नवीन अपडेट्स जारी केले आहेत.
पब्लिक वायफाय वापरताना काळजी घ्या : पब्लिक वायफायवर बँकिंग किंवा महत्त्वाचे काम करणे टाळा. पब्लिक वायफाय नेटवर्क सहसा असुरक्षित असतात, ज्यामुळे हॅकर्स तुमची माहिती चोरू शकतात.
अनोळखी लिंक्स आणि फाइल्स उघडू नका: ईमेल किंवा मेसेजमध्ये आलेल्या अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे टाळा. तसेच, अनोळखी स्रोतांकडून आलेल्या फाइल्स डाउनलोड करू नका.
स्ट्राँग पासवर्ड वापरा : तुमच्या सर्व अकाऊंटसाठी मजबूत पासवर्ड वापरा. शक्य असल्यास ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ चालू करा, ज्यामुळे तुमच्या अकाऊंटची सुरक्षा वाढते.
अॅप्सची परवानगी तपासा : तुम्ही इन्स्टॉल केलेल्या अॅप्सना कोणत्या परवानग्या दिल्या आहेत, ते तपासत राहा. अनेक अॅप्स अनावश्यक परवानग्या मागतात, ज्यामुळे तुमच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो.
सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर वापरा : तुमच्या डिव्हाईससाठी चांगल्या आणि विश्वासार्ह सायबर सुरक्षा सॉफ्टवेअरचा वापर करा. हे सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाईसला मालवेअर आणि इतर सायबर हल्ल्यांपासून संरक्षण देतात.