Roman-Era Mosaic | तुर्कियेमध्ये आढळले रोमन काळातील अप्रतिम मोझॅक

Roman-Era Mosaic |
Roman-Era Mosaic | तुर्कियेमध्ये आढळले रोमन काळातील अप्रतिम मोझॅक
Published on: 
Updated on: 

इस्तंबुल : तुर्कियेमध्ये (तुर्की) पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी उत्खननादरम्यान रोमन काळातील एक अत्यंत सुंदर आणि दुर्मीळ ‘मोझॅक’ (रंगीत दगडांच्या नक्षीकामाची फरशी) शोधून काढले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामात ‘एमराल्ड’ नावाची मांजर आणि ‘ओशन’ नावाच्या कुत्र्याची चित्रे कोरलेली आढळली.

पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, हे मोझॅक सुमारे २,००० वर्षांपूर्वीचे असून, ते एका श्रीमंत रोमन नागरिकाच्या भव्य वाड्याचा किंवा व्हिलाचा भाग असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्राचीन काळात लोक आपल्या पाळीव प्राण्यांवर किती प्रेम करत असत आणि त्यांना कौटुंबिक जीवनात किती महत्त्वाचे स्थान होते, याचे हे एक दुर्मीळ कलात्मक उदाहरण मानले जात आहे. या नक्षीकामाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यात केवळ प्राण्यांची चित्रेच नाहीत, तर ग्रीक किंवा लॅटिन लिपीत त्या प्राण्यांची नावेही स्पष्टपणे कोरण्यात आली आहेत.

मांजरीच्या चित्राजवळ ‘एमराल्ड’ (पाचू या रत्नावरून नाव) आणि कुत्र्याच्या चित्राजवळ ‘ओशन’ (महासागर) अशी नावे कोरलेली आढळली आहेत. प्राचीन रोमन काळात मोझॅक फरशीवर शिकारीची दृश्ये किंवा पौराणिक कथांची चित्रे असणे सामान्य मानले जाई. मात्र, घरगुती पाळीव प्राण्यांची चित्रे त्यांच्या नावांसह कोरलेली आढळणे ही एक अत्यंत दुर्मीळ घटना मानली जात आहे. हे अवशेष सध्या सुरक्षितपणे जतन करण्यात येत असून, लवकरच ते लोकांसाठी प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news