Cancer Risk Factors | तरुण पिढी वेगाने होतेय म्हातारी! कर्करोगाचा धोका वाढल्याचा नव्या संशोधनाचा दावा

Cancer Risk Factors |
Cancer Risk Factors | तरुण पिढी वेगाने होतेय म्हातारी! कर्करोगाचा धोका वाढल्याचा नव्या संशोधनाचा दावा
Published on
Updated on

लंडन : सध्याच्या तरुण पिढ्या त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक वेगाने वृद्ध (म्हातारे) होत असून, याचा थेट संबंध पन्नाशीखालील व्यक्तींमध्ये वाढणाऱ्या कर्करोगाच्या प्रमाणाशी असू शकतो, असा धक्कादायक दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुण-तरुणींमध्ये स्तन, कोलोरेक्टल (आतड्याचा), किडनी आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढले आहे. २०२३ मधील एका संशोधन पत्रिकेनुसार, १९९० ते २०१९ दरम्यान जगभरात तरुणांमधील कर्करोगाचे निदान २५ टक्क्यांनी वाढले आहे. वैज्ञानिक अजूनही यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यूकेमधील ‘वेलकम सँगर इन्स्टिट्यूट’च्या कर्करोग संशोधक डॉ. ज्योती नांगालिया (ज्या या संशोधनात सामील नव्हत्या) यांनी सांगितले की, ‘तरुणांमध्ये कर्करोग वाढण्याचा हा ट्रेंड अगदी खरा आहे. हे केवळ तपासण्या वाढल्यामुळे किंवा लवकर निदान होत असल्यामुळे घडत नाहीये. शक्यता अशी आहे की, आपण कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या काही नवीन घटकांच्या संपर्कात येत आहोत किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती बदलली आहे.’

२२ जून रोजी ‘नेचर मेडिसिन’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत आजच्या तरुण पिढीचे ‘वास्तविक वय’ (जन्मापासूनची वर्षे) आणि त्यांचे ‘जैविक वय’ (शरीराच्या पेशी आणि संस्था ज्या वेगाने म्हाताऱ्या होतात ते वय) या दोन्हीमध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. तरुणांमधील हे वाढते जैविक वयच त्यांना अकाली कर्करोगाच्या जाळ्यात ओढत असल्याचे दिसते. वाढते जैविक वय हेच कर्करोगाचे मुख्य कारण आहे, हे हा अभ्यास पूर्णपणे सिद्ध करू शकत नसला, तरी वैज्ञानिकांना या चिंतेच्या विषयाचा छडा लावण्यासाठी यामुळे नवीन दिशा मिळाली आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे महामारीतज्ज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक यिन काओ यांनी सांगितले की, ‘ही एक प्राथमिक संकल्पना आहे, ज्याच्या आधारे पुढील संशोधन केले जाईल.’

वास्तविक वय आणि जैविक वयातील फरक

आपले वास्तविक वय अगदी सोपे असते. आपल्या जन्मापासून किती वर्षे झाली, ती संख्या म्हणजे वास्तविक वय. परंतु, ‘जैविक वय’ प्रत्येक व्यक्तीनुसार खूप वेगळे असू शकते. यामध्ये आपल्या डीएनएमधील बदल आणि रक्तातील विशिष्ट घटकांचा समावेश होतो. शरीराची कार्यक्षमता आपल्या मूळ वयापेक्षा जास्त म्हातारी झाली आहे का, हे मोजण्यासाठी वैज्ञानिक ‘एजिंग क्लॉक्स’ या प्रणालीचा वापर करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news