

वॉशिंग्टन : चुनखडीच्या दगडावर कोरलेले छायाचित्रात दिसणारे हे महाकाय शिल्प माया संस्कृतीतील राणी ‘लेडी क’आबेल’ (ज्याचा अर्थ ‘वॉटर लिली हँड’ म्हणजेच कमळाचा हात असा होतो) हिचे प्रतिनिधित्व करते. माया कॅलेंडरमधील २० वर्षांचा काळ म्हणजेच ‘क’आटून’चा शेवट दर्शवण्यासाठी इसवी सन ६९२ मध्ये ही ‘स्टेला’ (कोरलेली दगडी शिळा) उभारण्यात आली होती.
ही शिळा सध्या ‘क्लीव्हलँड म्युझियम ऑफ आर्ट’च्या संग्रहात आहे. हे शिल्प सुमारे ९ फूट (२.७४ मीटर) उंच असून त्याचे वजन जवळपास २,५०० पाऊंड (१,१३४ किलोग्रॅम) आहे. कोरलेल्या चुनखडीच्या ४० पेक्षा जास्त तुकड्यांना जोडून याची पुनर्रचना करण्यात आली आहे. हा मूळ स्वतंत्र स्मारकाचा फक्त पुढचा भाग आहे. हे उत्तर ग्वाटेमालातील पेटेन प्रदेशातील ‘एल पेरू-वाका’ नावाच्या एका माया शहरात सापडले होते. पेटेनमध्ये लेडी क’आबेलचे हे शिल्प तिचे पती ‘क’इनिच बहलाम दुसरे’ यांच्या शिल्पाजवळ उभे होते, जे तिच्यापेक्षा कमी दर्जाचे होते. शक्तिशाली ‘कानुल’ किंवा ‘सर्प घराण्याची’ सदस्य म्हणून लेडी क’आबेलने ‘एल पेरू-वाका’ येथे लष्करी राज्यपाल म्हणून राज्य केले. शिल्पावरील माहितीनुसार तिला ‘इक्स कालोमटे’ म्हणजेच ‘सर्वोच्च महिला युद्धप्रमुख’ असे संबोधले गेले आहे.
तज्ज्ञांच्या मते, लेडी क’आबेलने कॅलाकमुल शहरातून टिकल शहराविरुद्ध सैन्याचे नेतृत्व केले असावे. राणीने परिधान केलेले पोशाख तिला माया संस्कृतीतील मक्याचा देव किंवा चंद्राच्या देवीशी जोडतात. तिच्या डोक्यावर हिरव्या रंगाच्या ‘क्वेत्झाल’ पक्षाच्या पंखांचा तुरा किंवा शिरोभूषण आहे. तिने जेड मण्यांपासून बनवलेला जाळीदार पोशाख आणि गळ्यातील हार घातला आहे. तिच्या जाळीदार पोशाखाच्या पट्ट्यावर माशासारख्या प्राण्याचे डोके कोरलेले आहे. सर्वोच्च महिला सैन्यप्रमुख म्हणून तिच्या हातात एक राजदंड आणि ढाल आहे. शिल्पाच्या डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला एक बुटका माणूस दिसतो, जो बहुधा तिचा सेवक किंवा दरबारी असावा. ही शिळा लेडी क’आबेलच्या २० वर्षांच्या राजवटीचा उत्सव साजरा करण्यासाठी तयार करण्यात आली होती.