वॉशिंग्टन : 'नासा'च्या कॅसिनी मोहिमेत शनी व त्याचे अनेक चंद्र यांचे जवळून निरीक्षण करण्यात आले होते. अनेक वर्षे सुरू राहिलेली ही मोहीम संपल्यावर 'कॅसिनी' यान शनीवरच आदळवून नष्ट करण्यात आले होते. मात्र, या यानाने पाठवलेल्या डेटाचा अजूनही अभ्यास होत असतो. शनीचे काही चंद्र विशेषतः एन्सिलाडस, टायटन यांच्याकडे संशोधकांचे विशेष लक्ष असते. आता संशोधकांनी म्हटले आहे की एन्सिलाडसवर बर्फाचे फवारे उडत असतात. बर्फाने आच्छादलेल्या या समुद्रात जीवसृष्टीची बीजे, जैविक रेणू असू शकतात असे संशोधकांना वाटते.
अत्यंत वेगाने हे बर्फाचे फवारे उडत असतात. बंदुकीतून गोळी झाडावी असाच हा प्रकार असतो. त्यांचा वेग ताशी 1448 किलोमीटर इतका प्रचंड असतो. एन्सिलाडसवरील समुद्रावर असलेल्या बर्फाच्या आवरणातून हे फवारे उडत असतात. या समुद्रात ऑर्गेनिक मॉलेक्यूल्स म्हणजेच जैविक रेणू असावेत असे संशोधकांना वाटते. मात्र, ते अभ्यासासाठी घ्यायचे झाल्यास ते नष्ट होणार नाहीत अशा पद्धतीने काळजीपूर्वक गोळा करावे लागतील.
आता एका नव्या प्रयोगातून दिसून आले आहे की जर या पाण्यात अमिनो अॅसिडस्ची शक्यता असेल तर ते अंतराळयानातही सुरक्षित ठेवता येऊ शकतील. एन्सिलाडसवर ज्याप्रमाणे बर्फाचे फवारे उडतात तसे प्रयोगशाळेतही करून पाहण्यात आले. अशा बर्फाच्या कणांमध्ये जीवसृष्टीच्या खुणा आहेत का हे कसे पाहायचे याचा यावेळी अभ्यास करण्यात आला. असे नमुने सहजपणे यानात सुरक्षित ठेवता येऊ शकतील असेही दिसून आले. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या नियतकालिकात देण्यात आली आहे.